आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:मराठवाड्याच्या आभाळी ‘गुलाब’चे काटे; चक्रीवादळाच्या पावसाने हाहाकार, पुरात वाहून गेल्याने दोघांचा, तर भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव प्रकल्पाचे अकरा दरवाजे उघडण्यात आल्याने सिंदफणा नदीला महापूर आला असून माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला महापुराचा वेढा आहे. छाया : गोविंद उगले - Divya Marathi
माजलगाव प्रकल्पाचे अकरा दरवाजे उघडण्यात आल्याने सिंदफणा नदीला महापूर आला असून माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला महापुराचा वेढा आहे. छाया : गोविंद उगले

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मराठवाडा आणि खान्देशात हाहाकार माजला असून मुसळधार पावसामुळे जागोजागी प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषत: मराठवाड्यात शेतांमध्ये पाणी साचल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. खान्देश वगळता राज्यात इतरत्र पावसाचा तेवढा जोर नसला तरी ठिकठिकाणी हलका पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर नाही. परंतु, चाळीसगाव परिसरात प्रचंड पावसामुळे या गावाला जवळपास पुराचा वेढा पडला आहे. त्यामुळे मदत व बचावकार्य सुरू आहे. मराठवाड्यातील धरणांसाठी संजीवनी ठरणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सध्या विसर्ग सुरू असून मंगळवारी जिल्ह्यात नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह नाशिक शहरातही हलका पाऊस झाला.

मांजराचे सर्व १८ दरवाजे उघडले
- दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर-उस्मानाबाद जिल्हा सीमेवरील धनेगाव येथील मांजरा धरण तुडुंब. सर्व १८ दरवाजे उघडले.
- माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले. या दोन्ही धरणांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. या नद्या, जवळील नाले-ओढ्यांनाही पूर आल्याने जवळ असलेल्या शेतीचे प्रचंड नुकसान.

औरंगाबादेत विक्रमी पाऊस :
- शहर व परिसरात सोमवारी रात्री ११.३० ते मंगळवारी सकाळी ११.३० वाजेपर्यंत वादळी वारे, मेघगर्जनेसह धो-धो पाऊस.
- शेकडो नागरिकांच्या घरांत पावसाचे पाणी शिरले. वाऱ्याने विद्युत खांब पडले, वाहिन्या तुटल्या, वृक्ष उन्मळून पडले.
- यंदाच्या पावसाळ्यातील दुसऱ्या मोठ्या पावसाची नोंद.
- यापूर्वी ७ सप्टेंबर रोजी विक्रमी १२७ मिमी पाऊस झाला हाेता. हर्सूल तलाव ओव्हरफ्लो होऊन पुलावरून पाणी वाहिल्याने एव्हरेस्ट कॉलेजमध्ये असलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेला विद्यार्थी मुकले.

प्रथमच मराठवाड्यात १४९% पाऊस
- १८२ मंडळांत मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत अतिवृष्टी. चालू पावसाळ्यात प्रथमच विभागात झाला सरासरीच्या १४९.१ टक्के पाऊस.
- २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचे विभागात यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थितीमुळे नुकसान.
- १२ तासांत चिकलठाणा ८५.१ मिमी, एमजीएम ९८.३, गांधेलीत ७४.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद

उस्मानाबाद जिल्ह्यात पूरस्थिती, हेलिकॉप्टरने बचावकार्य
गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सर्वत्रच जोरदार पाऊस होत असला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात सौंदणा, वाकडी आणि दाऊतपूर येथील काही घरांना मुसळधार पावसानंतर पुराच्या पाण्याने वेढले. या घरांत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. एनडीआरएफच्या पथकांनी अशा प्रकारे १७ जणांचे प्राण वाचवले.

...तर येईल शाहीन चक्रीवादळ
गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण ते दक्षिण गुजरात असा प्रवास करत गुरुवारपर्यंत अरबी समुद्राकडे येईल. याला अधिकची ऊर्जा मिळाल्यास त्याचे पुन्हा चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ही एक दुर्मिळ घटना राहील. या चक्रीवादळाला शाहीन हे नाव कतारने सुचवले असून त्याचा अर्थ गरुड असा आहे. सध्या उत्तर कोकण ते उत्तर आंध्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे २९ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात कोकण, मराठवाडा, उत्तर व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...