आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने दाणादाण:‘सहस्रकुंड’चा रुद्रावतार; रस्ते बंद, नदी-नाल्यांना पूर, परभणी आणि जालन्यात शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील नांदेड-किनवट रस्त्यावर इस्लापूरपासून काही अंतरावर असलेल्या पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रौद्ररूप धारण केले. छाया : महेश होकर्णे - Divya Marathi
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील नांदेड-किनवट रस्त्यावर इस्लापूरपासून काही अंतरावर असलेल्या पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधब्याने दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रौद्ररूप धारण केले. छाया : महेश होकर्णे

मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी नांदेड, परभणी, हिंगाेली, जालना, लातूर आदी जिल्ह्यांत पावसाने चांगलेच झाेडपून काढले. परभणी व नांदेडमध्ये शेतात पाणी साचल्याने पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून जाेरदार पाऊस हाेत असल्याने नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा गेट उघडण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. जालना जिल्ह्यात बुधवारी रात्री १५ मंडळांत अतिवृष्टी झाली. यामुळे ठिकठिकाणी साेयाबीन, कापूस, मका, मिरची आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. हिंगाेलीत सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदर्शन झालेच नाही. उस्मानाबादेत गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या सरी बरसल्या.

परभणी : शेतांमध्ये शिरले पाणी, पिकांचे मोठे नुकसान
जिल्ह्यात बुधवार (ता. २१) रोजी दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. १११ मिमी पाऊस झाल्याची नोंद गुरुवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने घेतली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. परभणी ,जिंतूर या महामार्गावर बोरी जवळ नागापूर येथे करपरा नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी गुरुवारी दुपारपर्यंत बंद होता. जिंतूर शहरात रस्त्यावर उभी असलेली चारचाकी वाहने पाण्यासोबत थोड्या दूर वाहून गेली आहेत. त्यात एक कार वाहून गेली तर दुसरी कार विजेच्या खांबावर जाऊन अडकली तर दुसरीकडे एक कार भिंतीवर जाऊन धडकली. पालम तालुक्यातून गोदावरीसह गलाटी, लेंडी या नद्या वाहतात. यापैकी गलाटी, लेंडी या दोन नद्यांना पूर आला आहे.

नांदेड : किनवट, नांदेड, उमरखेड, मार्गावर वाहतूक झाली ठप्प
जिल्ह्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात २४ मंडळांत अतिवृष्टी झाली. डॉ. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पाचे सहा गेट उघडण्यात आले. किनवट तालुक्यात २४ तासांपासून संततधार सुरू आहे. पैनगंगेसह तालुक्यातील लहान-मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. किनवट, नांदेड, उमरखेड, मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पैनगंगेच्या पुराचे पाणी किनवट येथील गोशाळेत शिरल्याने याठिकाणच्या गायींना व गंगानगर, मोमिनपुरा, नालागड्डा परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे नगराध्यक्षा आनंद मच्छेवार यांनी सांगितले. किनवट नांदेड मार्गावरील बेंदी येथील पुलाला आलेल्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत होती. हदगाव तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हदगाव-हिमायतनगर दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला. भोकर तालुक्यातील रावणगाव, पाळज येथील नद्यांचे पाणी गावांमध्ये शिरले. जिल्ह्यात सरासरी ६२.८ मिलिमीटर इतका दिवसभरात पाऊस झाला.

उस्मानाबाद : मध्यम ते हलक्या सरी
जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून संततधार सुरू असून, सूर्यदर्शनही नसल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या सरी बरसल्या. गुरुवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी २१.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५.६८ टक्के पाऊस झाला आहे.

हिंगोली : सरासरी ४२ मिमी पाऊस
जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी सूर्यदर्शन झाले नाही. गुरुवारी सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. जिल्ह्यात सरासरी ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जालना : साेयाबीन, मका पाण्याखाली
जिल्ह्यात बुधवारी रात्री १५ मंडळांत अतिवृष्टी झाली. यामुळे ठिकठिकाणी साेयाबीन,कापूस, मका, मिरची आदी पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीन खरडून गेली. सलग तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरत नसून नदी, नाले, ओढ्यांमधून वाहून जात आहे. या दमदार पावसामुळे भूजल पातळीत वाढ होणार असली तरी उगवून आलेल्या खरीप पिकांची मात्र नासाडी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पंचवीस वर्षीय युवक पुराच्या पाण्यात बेपत्ता
मुखेड तालुक्यातील कामजळगा येथील बस्वराज सीताराम गवाले (२५) हा गुरुवारी सकाळी शेतातून जनावरास चारा आणण्यासाठी मंग्याळ - कामजळगा गावालगत असलेल्या नदीवरील बंधारा ओलांडून शेताकडे जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पडला. यात तो वाहून गेल्याची घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...