आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात या वर्षी ‘छप्पर फाडके...’:23 दिवस अगोदर आठपैकी सहा जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत 109.8% पाऊस

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: संतोष देशमुख
  • कॉपी लिंक
  • यंदा प्रथमच 374 मंडळांत अतिवृष्टीचा झाला विक्रम

गतवर्षीप्रमाणे यंदाही मराठवाड्यावर मान्सून मेहरबान झाला आहे. २३ दिवस आधीच १०९.८ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गतवर्षी ५८४ मिमी पाऊस झाला होता. यंदा १६२.४ मिमी जास्त म्हणजे ७४६.४ मिमी पाऊस झाला. आठपैकी औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पावसाने सरासरी ओलांडली. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ १ ते ३ टक्के कमी पाऊस झाला.

१ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यात ६७९.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी ५८४ मिमी तर यावर्षी ७ सप्टेंबरच्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ७४६.४ मिमी प्रत्यक्ष पाऊस झाला. चार महिन्यांतील सरासरी पावसाच्या तुलनेत १०९.८ टक्के तर मान्सूनच्या गत ९९ दिवसांच्या तुलनेत १३५.२ टक्के जास्त पाऊस झाला आहे. स्थळनिहाय पावसाच्या वितरणात कमालीचा फरक आहे. अतिवृष्टी अधिक झाल्याने पावसाने साडेतीन आठवडे अगोदर सरासरीचा टप्पा ओलंडला.

१२ व्यक्तींचा गेला जीव : मराठवाड्यात १ सप्टेंबरपर्यंत एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू झाला. ६६४ जनावरे दगावली. ४१ घरे पडली आहेत. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान १४० मंडळात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने येथील बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरु असल्याने नुकसानीचा आलेख वाढणार आहे.

जलसाठ्यांत झाली वाढ : मराठवाड्यातील ११ पैकी ५ मोठी प्रकल्पात ८७.२२ टक्के, ७५ पैकी ११ मध्यम प्रकल्पात ७२ टक्के, तर सर्व मिळून ५६ टक्के, ७५३ लघु प्रकल्पांत ४७ टक्के तर एकूण ८७९ प्रकल्पांतील जलसाठा ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. खरिपातील पिकांना सिंचन व रब्बीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल, असे तज्ज्ञ म्हणत आहेत.

नांदेडमध्ये सर्वाधिक मंडळांमध्ये अतिवृष्टीची झाली नोंद
१ जून ते ७ सप्टेंबर दरम्यान दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ३७४ मंडळांत अतिवृष्टी होण्याच्या प्रथमच विक्रमाची नोंद हवामान, कृषी, महसूल विभागाने घेतली आहे. यामध्ये औरंगाबाद ३८, जालना ३९, बीड ५४, लातूर २९, उस्मानाबाद २५, नांदेड १०२, परभणी ४८ आणि हिंगोली ४० अशा एकूण ३७४ मंडळांचा अतिवृष्टीत समावेश आहे. मराठवाड्यात एकूण ४२१ मंडळे आहेत. एक ते तीनपेक्षा जास्त वेळा एकाच मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे. तर मराठवाड्यातील ३३ मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आहे. यात औरंगाबादचे ७, बीडमधील १, हिंगोली ५, लातूर ५, उस्मानाबाद ६, नांदेडचे ४, परभणीतील ३ मंडळांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...