आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यात वाढली:मराठवाड्याने पुन्हा मिळवून दिले कृषी क्षेत्राला गतवैभव, बीड, भंडारा, चंद्रपूर, उस्मानाबाद, परभणीतून निर्यातीमध्ये तीनपट वाढ

औरंगाबाद / संतोष काळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड या पाच जिल्ह्यांचा महाराष्ट्राच्या निर्यातीमध्ये ७१ टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. त्यामुळे परंपरिकदृष्ट्या या जिल्ह्यांनाच निर्यातीच्या दृष्टीने जास्त महत्त्व असते. परंतु कोरोनाकाळात निर्यातीचे गणित बदलले आणि कृषिपूरक उत्पादने, अभियांत्रिकी आणि वस्त्र क्षेत्रातील उत्पादनांना जागितक पातळीवर मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली. परिणामी त्याचा राज्याच्या अन्य जिल्ह्यांना फायदा झाला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकृत जिल्हानिहाय आकडेवारीवरून दिसून येते.

वाणिज्य मंत्रालयाने सप्टेंबर २०२० पासून जिल्ह्यांच्या निर्यात कामगिरीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यानुसार बीड, भंडारा, चंद्रपूर, उस्मानाबाद आणि परभणी या पाच जिल्ह्यांच्या निर्यातीमध्ये सप्टेंबर २०२० च्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये तीन पट वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. राज्यातून होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये या पाच जिल्ह्यांची निर्यात ०.३ टक्क्यांवरून वाढून ०.९ टक्क्यांवर गेली आहे याच काळात राज्यातील एकूण मासिक निर्यात ३० टक्क्यांनी वाढून ती सप्टेंबर २०२० मधील ३२,५१३ कोटी रुपयांवरून ४२,३४७ काेटी रुपयांवर गेली आहे. याच काळात देशातील एकूण निर्यात १.७९ लाख कोटी रुपयांवरून ३२,५१३ लाख कोटी रुपयांवर गेली.

या आधी राज्याच्या निर्यातीमधील जिल्ह्यांच्या योगदानाचा मागोवा घेणे खूप कठीण होते. परंतु केंद्र सरकारने सप्टेंबर २०२० पासून जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केल्यापासून या जिल्ह्यांची कामगिरी दृष्टिपथास येऊ लागली आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांमधील निर्यात स्पर्धात्मकतेचा विचार केल्यास साखर आणि केळींबाबत सोलापूर, कोल्हापूर बेडशीट, अमरावती, जळगाव परभणी, उस्मनाबाद आणि अकोला कापूस, साखर आणि नाशिक कांदा आणि द्राक्षांच्या निर्यातीत आगेकूच करत असल्याचे लक्षात येते. नाशिक, सिंधुदुर्ग सातारा, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांनीही राज्याच्या निर्यातीमध्ये तेवढेच भरीव योगदान दिले आहे. परंतु अगोदरच्या काळात या जिल्ह्यांमधून किती निर्यात होत होती याची आकडेवारी उपलब्ध नसल्याने नेमका अंदाज येत नसल्याचे एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कार्यकारी संचालिका रूपा नाईक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

राज्यातील निर्यातवाढीची कारण
- कोरानाकाळातील निर्बंध उठल्यानंतर बहुतांश अर्थव्यवस्था खुल्या झाल्याने मागणीत अचानक झालेली वाढ
- चीनला पर्याय म्हणून आयातदारांनी आैषधे, अभियांत्रिकी वस्तूंच्या पुरवठ्यासाठी भारताकडून वाढलेली मागणी
- चांगल्या पावसामुळे कृषी उत्पादनात झालेली भक्कम वाढ
- प्रामुख्याने निर्यात करणाऱ्या देशात हवामान आणि पुरवठा साखळी तुटल्यामुळे जागतिक बाजारपेठेत तांदूळ, साखर आणि अन्य कृषिपूरक वस्तूंचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे महाराष्ट्राच्या कृषी निर्यातीमध्ये २०२०-२१ मध्ये १४ टक्के वाढ झाली.

महाराष्ट्रातून या देशांना होते निर्यात : हाँगकाँग, इंडोनेशिया, श्रीलंका, फिलिपाइन्स. संयुक्त अरब अमिरात, ओमान, इराण, इराक,
मादागास्कर, केनिया उत्पादन माल : बिगर बासमती तांदूळ, मका, गूळ, मिठाई, वाइन, कांदे, प्रक्रिया केलेल्या भाज्या, डाळी

बातम्या आणखी आहेत...