आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा साहित्य संमेलन:सद्य:स्थिती पाहता देशाला आता साहित्यिकच वाचवू शकतात! - मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे मत

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समाराेपप्रसंगी बोलताना जितेंद्र आव्हाड. - Divya Marathi
रविवारी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समाराेपप्रसंगी बोलताना जितेंद्र आव्हाड.

पुरोगामी विचारांची पिढी बाजूला सरकली आहे. विवेकी विचार असणाऱ्या लाेकांना गोळ्या घातल्या जातात. हिटलरच्या झुंडशाहीविरोधात एका लेखकाने लिहिले हाेते, ते लोकांनी ऐकले. आता आपल्या देशातील सद्य:परिस्थिती पाहता साहित्यिकच समाजाला वाचवू शकतात. विचारांची देवाण-घेवाण, लोकशाही मूल्यांचा सन्मान शाबूत ठेवायचा असेल तर तसे साहित्य टिकवावे लागेल, असे मत राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केले.

मसाप व लाेकसंवाद फाउंडेशनतर्फे आयाेजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समाराेपप्रसंगी ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार होते. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मसापचे कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष के. एस. अतकरे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, डॉ. राम चव्हाण, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रामचंद्र काळुंखे, हंसराज जाधव, डॉ. कैलास अंभुरे, नीलेश राऊत, फुलचंद सलामपुरे, किरण सगर यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात रा. रं. बाेराडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. ‘मराठवाडा हा संघर्षाबराेबरच कर्तृत्ववान माणसांचीही भूमी आहे. त्यातून साहित्य- संस्कृती वेगळी करता येणार नाही. विचित्र विचारांचे जाळे पसरवले जातेय, ते नष्ट करण्यासाठी फक्त लेखकांनीच नव्हे, तर वाचकांनीदेखील पुढे यायला हवे,’ असे आवाहनही आव्हाड यांनी केले.

तु.शं.चा विसर पडल्याबद्दल माफी
मराठवाडा साहित्य परिषदेला ७५ वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय आणि अशासकीय स्तरावर वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करायचे आहेत. कार्यक्रमांसाठी पैशाची आवश्यकता असून तुम्ही ते द्यावेत, अशी मागणी मसापचे अध्यक्ष काैतिकराव ठाले पाटील यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली. तु. शं. कुलकर्णी हे माजी संमेलनाध्यक्ष होते. त्यांच्या श्रद्धांजलीचा स्वतंत्र ठराव घ्यायला हवा हाेता, पण तसे झाले नाही असे सांगून ठालेंनी सभागृहाची माफीही मागितली.

बातम्या आणखी आहेत...