आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन:शरद पवार-ठाकरेंच्या सभा चालतात, मग साहित्य संमेलन का नाही? : कौतिकराव ठाले पाटील यांचा खडा सवाल

संत जनाबाई साहित्यनगरी (औरंगाबाद) / नामदेव खेडकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन घेताना मनात अनेक प्रश्न होते. आपल्यावर गुन्हे दाखल होतील, अशी चर्चा आमच्यात झाली. पण, मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार, अशोकराव चव्हाण यांच्या कार्यक्रमांना गर्दी होतेच ना… त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल होतात? मग आपल्यावरच कसे होतील? त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यास ते मागे घेतले जातील आणि त्यांच्यासोबत आपल्यावरीलही गुन्हे मागे घेतले जातील. चांगल्या कामासाठी होऊ द्या गुन्हे दाखल. त्याने काहीही फरक पडणार नाही, असे वक्तव्य मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण, संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ठाले पाटलांनी आपल्या शैलीत अशोकराव चव्हाण आणि सरकारला फटकारले. संमेलन साहित्याचे असले तरी सर्वाधिक चर्चा ठाले पाटलांच्या राजकीय फटकेबाजीचीच झाली.

१२ आमदारांच्या नियुक्त्यांवरही टिप्पणी : ठाले पाटील म्हणाले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना याच सभागृहाचे काम सुरू होते. विलासराव एका कार्यक्रमाला आले. तेव्हा फक्त भिंती उभ्या होत्या, पंखे नव्हते. घामाने आणि माझ्या भाषणाने विलासराव घामाघूम झाले. या संस्थेला काहीतरी अनुदान द्या, ही माझी मागणी होती. सध्या जशा १२ आमदारांच्या नियुक्त्या अडवून ठेवलेल्या आहेत, तसे १२ आमदार तेव्हा निवडून आले होते. त्यांच्या माध्यमातून विलासरावांनी आणि शरद पवार, जयंत पाटील यांनी या संस्थेच्या विकासाला हातभार लावला, असे ठाले पाटील म्हणाले. १२ आमदारांचा मुद्दा काढताच सभागृहात एकच हशा पिकला.

राजवाडेंचा खोडसाळपणा आद्यकवी मुकुंदराज बीडचेच
मराठवाडा ही मराठीची जन्मभूमी आहे. इथेच मराठीतील पहिला काव्यग्रंथ लिहिला गेला. मात्र, इतिहासतज्ज्ञ राजवाडे यांनी खोडसाळपणा करून मराठीतला पहिला ग्रंथ विदर्भात लिहिला, असा शोध लावला. मात्र, ते चुकीचे आहे. आद्यकवी मुकुंदराज हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असल्याचे अनेक पुरावे समोर आलेले आहेत. आपण इतिहास घडवतो, मात्र तो लिहीत नाही, त्यामुळे असे खोटे संदर्भ चव्हाट्यावर येतात, असे ठाले पाटील म्हणाले.

मंत्रिमंडळात २० वर्षे राहणे अशक्य, ठाले पाटील इतके दिवस अध्यक्ष कसे? : चव्हाण
ठाले पाटलांच्या फटकेबाजीनंतर अशोकराव चव्हाणांचे उद्घाटकीय भाषण झाले. ते म्हणाले, आम्हाला मंत्रिमंडळात २० वर्षे टिकून राहणे शक्य नाही. ठाले पाटील २० वर्षांपासून मसापचे अध्यक्ष कसे राहिले, याचे मला आश्चर्य वाटते. (ठाले पाटलांकडे पाहत) तुमच्या भाषणाने विलासरावांना घाम आला असेल, पण मला नाही आला. मी तुमच्या मागण्यांचा विचार करतो. सहा महिन्यांत नांदेडमध्ये मसापच्या कार्यालयाला जागा देऊ. तसेच अन्य प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊ. कृती आराखडा बनवू. त्याच्या अंमलबजावणीसाठी दर सहा महिन्यांनी बैठक घेत राहू, असा ‘शब्द’ या वेळी अशोक चव्हाणांनी दिला.

अशोकराव पाच वर्षांपूर्वी ‘करतो’ म्हणाले, पण ‘कधी’ ते नाही सांगितले!
ठाले पाटील म्हणाले, ‘मसाप’चा जन्म नांदेडमध्ये झाला. आजवर संस्था विस्तारली. पण, जन्मभूमी नांदेडमध्ये हक्काचे कार्यालय अजून झाले नाही. याविषयी मी अशोकरावांना ५ वर्षांपूर्वी पत्र दिले, तेव्हा ते ‘करतो’ म्हणाले. पण, अजूनही आम्हाला जागा मिळाली नाही. (अशोकरावांकडे पाहत) तुमचा मनपा आयुक्त आम्हाला विचारतो, तुम्ही किती पैसा खर्च करणार? आमच्याकडे पैसे कुठून येतील. अशोकराव त्या वेळी काम करतो म्हणाले, पण कधी हे नाही सांगितले. आता इथून गेल्यावर ते आपल्या आयुक्तांना सांगतील आणि मसापला जन्मभूमीत जागा मिळेल.

बातम्या आणखी आहेत...