आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्यकांत विश्वासराव यांचा दावा:म्हणाले-सत्ताधाऱ्यांची धमकी, पैशाचे अमिष, संस्थाचालकांचा दबाव यामुळेच विजय दुरावला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा शिक्षक संघ विजयाच्या मार्गावर होता मात्र मतदानाच्या दोन दिवसा अगोदर आमच्या मतदारांवर मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांकडून दबाव टाकण्यात आला. पैशाचे अमिष दाखवण्यात आले. संस्था चालकाकडून धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे जो आमचा विजय निश्चित होता तो आमच्यापासून दुरावला गेला. अशी प्रतिक्रिया मराठवाडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली आहे.

सूर्यकांत विश्वासराव यांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम काळे यांना 19768 तर किरण पाटील यांना 13,247 आणि सूर्यकांत विश्वासराव यांना 13216 मते पडली आहेत. त्यामुळे विक्रम काळे सध्या पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये 6521 मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये अधिकृत घोषणा मात्र होणे बाकी आहे. त्यामुळे मताच्या आकड्यात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक टेबल वरती 1000 मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. 56 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या पसंतीचे मतदान मोजण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन तासात अनपेक्षितरित्या सूर्यकांत विश्वासराव यांनी आघाडी घेतली होती. मात्र आता चित्र बदलले आहे.

सत्ताधाऱ्यांनी उलटवले आमचे गणित

यावेळी बोलताना सूर्यकांत विश्वासराव म्हणाले की, शिक्षकांचा आम्हालाच पाठिंबा होता. आम्ही मराठवाड्यात शिक्षकांना पेन्शन तसेच शिक्षकांच्या मागण्यांसाठीचा सर्व प्रचार केला होता. आम्हाला सर्व शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात आमचे गणित सत्ताधाऱ्यांनी उलटवले. त्यामुळेच आम्ही पिछाडीवर आल्याचे सूर्यकांत विश्वासराव यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

कोण बाजी मारणार?

नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...