आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त विद्यापीठ नामविस्तार दिनाचे:नामांतराचा प्रस्ताव विद्यापीठात मान्य, विधिमंडळात मंजुरीसाठी पेटवावे लागले आंदोलन

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेवटच्या माेर्चाचे नेतृत्व करणारे प्राचार्य राजाराम राठोड यांनी उलगडला आंदोलनाचा पट

एप्रिल १९७७ दरम्यान विद्यापीठाच्या तत्कालीन कार्यकारी परिषदेत विद्यापीठ नामांतराचा पहिला ठराव प्राचार्य राजाराम राठोड यांनी मांडला होता. तेव्हापासून १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्तार होईपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषणा करण्याच्या दोन महिने आधी म्हणजेच नोव्हेंबर १९९३ दरम्यान नामांतराच्या मागणीसाठी शेवटचा मोर्चाही राठोड यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. विशेष म्हणजे क्रांती चौक ते शहागंजपर्यंत याच मागणीसाठी जाे ४० हजारांचा पहिला मोर्चा काढण्यात आला होता त्यातही राठोड होतेच. नामविस्तार दिनाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त या सर्व आठवणींना वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य राजाराम राठाेड यांनी दिलेला उजाळा त्यांच्याच शब्दांत...

तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेत मी प्राचार्यांच्या मतदारसंघातून निवडून गेलो होतो. एप्रिल १९७७ दरम्यानची ही आठ‌वण असेल. कार्यकारी परिषदेची बैठक सुरू होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महा‌‌विद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य संदानशिवे आणि दिवंगत डॉ. मनोहर गरुड यांच्यासह एक शिष्टमंडळ निवेदन घेऊन आले होेते. त्या वेळी पँथर नेते गंगाधर गाडे विद्यापीठ गेटवर आंदोलन करत होते. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या, तसा ठराव कार्यकारी परिषदेत मंजूर करा म्हणून शिष्टमंडळाचा आग्रह होता. आम्हा सर्व सदस्यांचीही तशीच इच्छा हाेती. माझ्यावर प्राचार्य ना. य. डोळे यांचे संस्कार. शिवाय राष्ट्र सेवा दलात मी काम केलेला कार्यकर्ता होताे. त्यामुळे मीच नामांतराचा ठराव बैठकीत मांडला. अहमदपूरचे प्रा. किसनराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. कमलकिशोर कदमदेखील सदस्य होते. सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला.

असा ठराव फक्त विद्यापीठात होऊन चालत नाही. विधिमंडळात ठराव झाला तरच त्याला महत्त्व असते. मग त्यासाठी दबाव वाढ‌वण्याची गरज लक्षात आली. पुढे विधिमंडळानेही ठराव मंजूर केला. पण नामांतरवादी आणि नामांतरविरोधी असे दोन गट पडले. त्या वेळी मराठवाड्यात दंगली भडकल्या. दलितांच्या झोपड्या जाळण्यात आल्या. अशा लाेकांसाठी हर्सूल येथे कॅम्प उभारला होता. या कॅम्पमध्ये आम्ही कपडे, संसारोपयोगी भांडी, धान्य आदी मदत नेेऊन द्यायचाे. पण वाद कसे मिटवायचे हे कुणाच्याच लक्षात येत नव्हते. सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू हाेते. नामांतराची मागणी केवळ दलितांची नाही, तर दलितेतरांचीही आहे हा संदेश सर्वांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी नामांतरवादी विद्यार्थी- नागरिक कृती समिती गठित केली. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य तथा बाबासाहेबांचे सहकारी म. भि. चिटणीस हे अध्यक्ष, तर संपादक बाबा दळवी कार्याध्यक्ष होते.

बापूराव जगताप, संघटक फ. मुं. शिंदे, सुभाष लोमटे, डी. एल. हिवराळे, तकी हसन खान, प्रकाश वांगीकर यांचाही समितीत समावेश केला. नामांतर फक्त एखाद्या वास्तूचे करायचे नव्हते, तर सामाजिक न्याय, समता प्रस्थापित करण्यासाठी पुकारलेले हे आंदोलन होते. यासाठी आम्ही जाणीव जागृती करण्यास सुरुवात केली. मराठवाड्यात दंगली झाल्यामुळे शरद पवारांनी विधिमंडळात झालेला ठराव स्थगित केला होता. मग तिथून पुढे आंदोलने सुरू झाली. आम्ही औरंगाबादेत क्रांती चौकातून ४० हजारांचा पहिला मोर्चा काढला. यात बापूराव जगताप, बाबा दळवी, नानासाहेब शिंदे, गंगाधर गाडे यांचाही समावेश होता. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव यांनी नामांतराला विरोध केला होता. त्यांना समजून सांगण्यासाठी ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी शहरात आले होते. पण काही जणांनी त्यांच्या गळ्यात चपलांचा हार टाकला होता. ‘आधी तुमच्या पुणे विद्यापीठाला नाव द्या. आमच्या विद्यापीठाला नाव द्यायला का निघाला आहात..?’ या शब्दांत जोशींना सुनावण्यात आले.

कालांतराने प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा लाँगमार्च सुरू झाला होता. गाडेंचे आंदोलन जोरात होतेच. मिलिंद कॉलेज, वसंतराव नाईक महाविद्यालय नामांतर चळवळीचे केंद्र झाले होते. बापूराव जगताप अग्रणी होतेच. तेच कॉलेजमध्ये बैठका घेत. त्यांना कारावासही भोगावा लागला. काही जण म्हणायचे, त्यांना नोकरीवरून काढून टाका.

पण असे हाेणार नसल्याचे मी विरोधकांना ठणकावून सांगत होतो. सुमारे १७ वर्षे आंदोलन सुरूच राहिले. शेवटचा मोर्चा नोव्हेंबर १९९३ दरम्यान निघाला. त्याचे नेतृत्व मीच केले. शेवटी शरद पवार यांनीच १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्ताराची घाेषणा केली. कारण गोविंदभाईंनी मराठवाड्याच्या वृथा अस्मितेसाठी नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ द्या, अशी मागणी केली होती. त्यामुळे विद्यापीठाचे विभाजन झाले. संपूर्ण नामांतर होण्याऐवजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार झाला. त्यातही आम्ही समाधान मानले. आता मात्र विविध स्वार्थी संघटनांनी विद्यापीठाला ग्रासले आहे. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या उच्च शिक्षणातील गुणवत्तेसाठी आपल्याला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.

प्राचार्य म्हणून काम केले, कॉलेजही स्थापले, रिपब्लिकन पक्षाकडून विधानसभा ल‌ढवली
प्राचार्य राठोड उदगीर तालुक्यातील सोमनाथपूरचे रहिवासी. आठवीपर्यंत उदगीरला, तर मॅट्रिकपर्यंत शिक्षण नांदेडमध्ये घेतले. तिथे बंजारा वसतिगृहात राहून पीपल्स कॉलेजमध्ये बीए केले. या कॉलेजमध्ये १९५७-५८ दरम्यान विद्यार्थी संसदेचे बिनविराेध अध्यक्षही झाले. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्यासाेबत पुण्यात एमए राज्यशास्त्र केले. विद्यावर्धिनी शाळेची १९६० दरम्यान स्थापना केली. पुन्हा मराठवाडा विद्यापीठात एमए (हिस्ट्री) केले. मग उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून १९६९-७० दरम्यान रुजू झाले. वसंतराव नाईक कॉलेजची स्थापना १५ जून १९७२ रोजी केली. रिपब्लिकन पक्षाकडून त्यांनी उदगीरमधून विधानसभा निवडणूकही ल‌ढवली हाेती.

शब्दांकन : डॉ. शेखर मगर

बातम्या आणखी आहेत...