आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंकडे रेल्वे खाते:मराठवाड्याच्या आशा पल्लवित; केंद्रात हक्काचा माणूस मिळाल्याने आठही जिल्ह्यांच्या रेल्वेमार्गांना ‘वेग’ मिळणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • औरंगाबाद येथून उत्तर व दक्षिण भारत जोडणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढवणे

मोदी सरकारमधील माेठ्या अदलाबदलीतही आपले राज्यमंत्रिपद कायम राखण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना यश आले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या दिवसभर टीव्हीवर सुरू हाेत्या, मात्र त्या अफवाच ठरल्या. उलट अन्न व नागरी पुरवठा या आधीच्या खात्यामध्ये बदल करून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आता दानवेंकडे रेल्वेसारखे महत्त्वाचे खाते साेपवले आहे. गेली अनेक वर्षे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न दुर्लक्षित आहेत. आता दानवेंच्या रूपाने प्रथमच या भागाला रेल्वे मंत्रिपद मिळाल्यामुळे विद्युतीकरणासह रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारने मराठवाड्याच्या ताेंडाला पाने पुसली, अशा प्रतिक्रिया उमटत असतात. मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गाेविंदभाई श्राॅफ, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक ओमप्रकाश वर्मा आदींनी वारंवार पाठपुरावा करूनही अनेक प्रश्न आजतागायत सुटू शकलेले नाहीत. मराठवाड्यातील लाेकप्रतिनिधींची एकजूट हाेत नसल्याने आतापर्यंतच्या काेणत्याही सरकारने या भागातील रेल्वे प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, अशी खंत हे मान्यवर आंदाेलक नेहमी व्यक्त करतात.

मात्र त्याचा काेणताही परिणाम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या खासदार-आमदारांवर हाेताना दिसत नव्हता. माेदींनी लक्ष घातल्याने नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला सुरुवातीच्या काळात चांगला निधी मिळाला, मात्र नंतर हे कामही रखडले. त्यामुळे सक्षम नेतृत्व मिळाले तरच आतापर्यंत विकासाच्या दृष्टीने मागास ठरलेल्या मराठवाड्यातील रेल्वेचे जाळे विस्तारू शकते, असा निष्कर्ष अभ्यासकांमधून काढला जात हाेता. आता याेगायाेगाने रावसाहेब दानवेंसारख्या ज्येष्ठ नेत्याकडे देशाचे रेल्वे राज्यमंत्रिपद आलेले आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रश्न साेडवण्यासाठी मराठवाड्याला हक्काचा माणूस मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून औरंगाबाद, जालन्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाची ‘रेल्वे’ वेगाने धावू शकेल, याबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.

वर्षानुवर्षे रखडलेले रेल्वे प्रकल्प

 • मनमाड ते परभणी दुहेरीकरण
 • परळी-बीड-नगर रेल्वेमार्ग
 • औरंगाबाद येथून उत्तर व दक्षिण भारत जोडणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढवणे
 • दौलताबाद-चाळीसगाव मार्ग
 • रोटेगाव-कोपरगाव मार्ग
 • मनमाड-मुदखेड दुहेरीकरण
 • बंगळुरू-नांदेड रेल्वेचा विस्तार औरंगाबादपर्यंत हाेणे
 • नांदेड-संत्रागच्छी ( कोलकाता) औरंगाबादपर्यंत
 • जालना- खामगाव रेल्वेमार्ग
 • औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्ग
 • सोलापूर-औरंगाबाद-जळगाव रेल्वेमार्ग
बातम्या आणखी आहेत...