आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची व्यथा:मराठवाड्यातील 9311 किमी पाणंद रस्त्यांसाठी मार्चअखेरचे टार्गेट; पण मुदतीत पूर्ण होणे अशक्यच

प्रवीण ब्रह्मपूरकर | औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
 कैलास तवार - Divya Marathi
 कैलास तवार

सततच्या अतिवृष्टीमुळे शेतातील पाणंद रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळात मातोश्री पाणंद योजना सुरू झाली. त्याबाबत ११ नोव्हेंबर २०२१ रोजी अध्यादेश काढला होता. गेल्या वर्षभरात प्रशासकीय पातळीवर बैठका घेऊन रस्त्याच्या तांत्रिक सर्व्हे आणि प्रशासकीय मान्यतांची कामे करण्यात आली आहेत. पण वर्षभर पाणंद रस्त्यांचे केवळ कागदावर नियोजन झाले असून रस्त्याच्या कामाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. मराठवाड्यात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेर ९३११ रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या वर्षी ३१ मार्चपर्यंत रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण सद्य:स्थिती पाहता या काळात ते पूर्ण होणे अशक्यच आहे. गेल्या चार वर्षांपासून मराठवाड्यात सातत्याने अतिवृष्टीच्या फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सततच्या पावसामुळे पाणंद रस्ते उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड बनले आहे.

योजनेस जबाबदार, दोन्ही सरकारमध्ये रोहयोमंत्री असलेल्या भुमरेंचे दुर्लक्षच नियोजनातच गेले एक वर्ष रोहयो विभागाला बैठका, सर्व्हे, याद्या तयार करणे, तांत्रिक मंजुरी, आराखडे या कामासाठी एक वर्ष लागले. मराठवाड्यात २५ जानेवारी रोजी पहिली यादी, ९ मार्चला दुसरी जाहीर झाली. टप्प्याटप्प्याने आठवी यादी २२ सप्टेंबरला देण्यात आली. रोहयो उपायुक्त समीक्षा चंद्राकार म्हणाल्या, “मार्चअखेरपर्यंत रस्ते पूर्ण करण्याच्या सूचना आहेत.’

मराठवाड्यात ९३११ रस्ते मराठवाड्यात ९३११ रस्ते होणार असून ५०१४ रस्त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. पैकी २६२३ कामे सुरू झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २०७३, जालना १४३४, बीड १७५१, परभणी १३८७, हिंगोली ४६६, नांदेड ८९५, लातूर ७०६, उस्मानाबाद ५९९ रस्ते मंजूर करण्यात आले आहेत.

सत्तांतरानंतर विसर ठाकरे सरकारमध्ये रोहयोमंत्रिपद संदिपान भुमरेंकडे होते. अध्यादेश निघताच त्यांनी तातडीने रस्ते करण्याचे आदेश दिले होते. पण गेले वर्षभर प्रत्यक्ष कामांना वेग आला नाही. नंतर सत्तांतरात भुमरेंचेही कामाकडे दुर्लक्ष झाले. आता भुमरेच रोहयोमंत्री आहेत. तरीही मराठवाड्यातील कामांना गती मिळालेली नाही.

माझे खुले आव्हान, मार्चपूर्वी काम करूनच दाखवा : दानवे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र हे खातेच अकार्यक्षम असल्यामुळे रस्त्यांची कामे होत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड बनले आहे. माझे भुमरे यांना खुले चॅलेंज आहे, त्यांनी मार्चपर्यत रस्ते पूर्ण करून दाखवावेत, असे आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले. ‘दिव्य मराठी’ने भुमरेंना अनेकदा फोन केले. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शेतकरी यातना भोगताहेत, सरकार भांडणात अडकलेय ^सततच्या पावसामुळे पाणंद रस्ते उद‌्ध्वस्त झालेत. मजूर शेतात येण्यास तयार नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना जास्तीची मजुरी द्यावी लागत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर माल बाजारात नेता येत नाही. त्यामुळे खर्च वाढत आहे. सरकारचा वेळ मात्र राजकीय भांडणातच जात असून त्यांना योजनेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. कैलास तवार, शेतकरी संघटना

बातम्या आणखी आहेत...