आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध.) येथे मद्यपींचा त्रास वाढला असून अगदी चौथीचे विद्यार्थीही दारू पिऊन गावात धिंगाणा घालत आहेत. संयमाचा बांध फुटल्याने गावातील तब्बल १८० महिलांचा मोर्चा नांदेडला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शाळकरी मुलेही १०-१० रुपये जमवून एकत्र येत दिवसाढवळ्या दारू पितात, या प्रकाराला कंटाळून तत्काळ दारूबंदी करण्याची आग्रही मागणी महिलांनी केली. दरम्यान, ग्रामसभा घेऊन गावातील महिलांच्या स्वाक्षऱ्या घ्या, तत्काळ दारूबंदी करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले.
धर्माबाद तालुक्यातील १४०० लोकसंख्या असणाऱ्या नायगाव (ध.) या गावापासून अवघ्या दीड-दोन किलोमीटरवर तेलंगण राज्याची सीमा सुरू होते. येथील गावची लोकसंख्या १४०० च्या आसपास आहे. तेलंगणाच्या तुलनेत अत्यंत कमी किमतीत दारू मिळत असल्याने येथे दिवसभर दारू खरेदीसाठी लोकांची रीघ असते. गावातील पुरुष मंडळीही दारूच्या आहारी गेल्याने महिलांना मारहाण करत असल्याची तक्रार करत महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. विजयालक्ष्मी कासनेवाल, रंजना नुनेवार, पद्मा कासलेवाल, सुमित्रा मनुरे, शारदा कदम, शोभा यलपागार, गंगामणी लिंगोड, सावित्रा शामलवार आदींसह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.
शाळा बंद, उपद्व्याप सुरू
गावापासून एक ते दीड किमी अंतरावर तेलंगण राज्य आहे. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. लहान वर्गाचे २०० च्या आसपास, तर मोठ्या वर्गाचे १०० ते १५० विद्यार्थी असून शाळा बंद असल्याने मुले घरीच आहेत. ऑनलाइन वर्ग, अभ्यास असा कुठलाही प्रकार येथे नाही. आईवडील दिवसभर शेतात असतात. त्यामुळे त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने मुले एकत्र येऊन नको ते उपद्व्याप करतात, असे महिलांनी सांगितले.
सकाळी ८ पासून लागते रांग; अनेकदा तक्रारी करून फायदा नाही
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान महिलांनी धर्माबादचे तहसीलदार व राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे तक्रार केली. पण फायदा झाला नाही. त्यामुळे नांदेड गाठावे लागले. गावात दारू घेण्यासाठी सकाळी ८ वाजेपासून तेलंगणातील लोकांसह गावातील पुरुष मंडळी रांगा लावतात. तेलंगणात देशी दारू महाग आणि चांगल्या दर्जाची नसल्याने येथे येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे महिलांनी सांगितले. दारूमुळे गावात वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. हाणामारीचे गुन्हे दाखल झाले आहेत, असे महिलांनी सांगितले.
बचत गटाचा पुढाकार
पतीसह चौथीची मुलेही दारूच्या आहारी गेली आहेत. दिवसभर पुरुष दारू पितात, रात्री महिला कामावरून आल्यावर त्यांना मारहाण करतात. बचत गटाने पुढाकार घेतल्याने आम्ही दारूबंदीसाठी मागणी केली आहे. - रेखा गडमोड, रहिवासी, नायगाव (ध.)
एकवेळ बायको सोडतील, पण...
गावातील पती पत्नीला सोडतील पण दारूला सोडायला तयार नाहीत. शाळा बंद असल्याने मुलांवरही वाईट परिणाम होत आहेत. गावातील देशी दारूचे दुकान बंद करावे. - देऊबाई कदम, रहिवासी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.