आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी परीक्षा:पदवी परीक्षेचा बाजार; एका बाकावर तीन विद्यार्थी ; यादीत नाव नाही, पण हॉलतिकीट विद्यार्थ्यांच्या हाती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेला बुधवार (१ जून) गोंधळाने सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी तर एका बाकावर चक्क तीन विद्यार्थ्यांना बसवून परीक्षा घेण्यात आली. खाेकडपुऱ्यातील विजेंद्र काबरा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर आधी ४६६ विद्यार्थी होते. प्रत्यक्ष पेपरला ७५० विद्यार्थी वाढवण्यात आले. क्षमता नसताना या अतिरिक्त विद्यार्थ्यांना कुठे बसवायचे, असा प्रश्न होता. शेवटी एका बाकावर तीन विद्यार्थी दाटीवाटीने बसवण्यात आले. मग विद्यार्थ्यांनी एकमेकांचा पेपर पाहून पेपर सोडवला. बुधवारी पहिल्या दिवशी पदवीच्या पुनर्परीक्षार्थींचा पेपर होता. तर २ जूनला सकाळच्या सत्रात बीएस्सी बायोटेक, बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांचा सकाळी ९ वाजता पेपर होता. विजेंद्र काबरा महाविद्यालयात अलॉटमेंट दिलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक विद्यार्थी आले. क्षमता ४६६ जणांची होती. मात्र ऐनवेळी ७५० विद्यार्थी पाठवल्याने एकच गोंधळ उडाला. सकाळी ९ चा पेपर ९:३० नंतर सुरू झाला. ऐनवेळी आलेल्या काही विद्यार्थ्यांची नावे यादीत नव्हती. पण त्यांच्याकडे हॉलतिकीट होते. त्यांचा पेपर ११:३० वाजता सुरू झाला. त्यांना वेळ वाढवून देण्याता आला. ८०-२० पॅटर्न असल्याने दोन तासांचा पेपर होता. या सर्व प्रकाराने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार समोर आला. आता इं.भा. पाठक व मिलिंद महाविद्यालयात असेल केंद्र विजेंद्र काबरा महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधांमुळे परीक्षा केंद्र तत्काळ बदलून ते मिलिंद विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महाविद्यालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीएस्सी बायोटेक्नॉलॉजीचे एक टू झेड आणि बीएस्सी कॉम्प्युटर सायन्सचे एक टू एम असलेल्या विद्यार्थ्यांचे नंबर मिलिंद विज्ञान महाविद्यालयात असतील. तर बीएससी कॉम्प्युटर सायन्सचे एन टू झेड अद्याक्षर असलेले नंबर डॉ.सौ. इंदिराबाई पाठक महाविद्यालयात असतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

फेरपरीक्षा, संचालकांच्या राजीनाम्याची मागणी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्या योगिता होके-पाटील यांनी केंद्राच्या ठिकाणी भेट दिली. तेव्हा एका बाकावर तीन ते चार परीक्षार्थी बसलेले दिसले. आता या केंद्रावरील विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घेण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनापुढे करणार आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घडलेल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गणेश मंझा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. ७०० विद्यार्थी वाढले, नुकसान होऊ दिले नाही ६०० क्षमतेच्या आमच्या केंद्रावर ४६६ विद्यार्थी दिले होते. गुरुवारी नव्याने ७०० विद्यार्थी वाढवले. काही जणांकडे हॉलतिकीट होते, पण यादीत नाव नव्हते. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षेला बसू दिले. पेपर उशिरा सुरू झाल्याने वेळ वाढवून देण्यात आला. - डॉ. सतीश सुराणा, प्राचार्य, विजेंद्र काबरा महाविद्यालय आता गडबड होणार नाही विजेंद्र काबरा महाविद्यालयात परीक्षा केंद्राचे प्रमुख तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांना अहवाल मागितला आहे. हे दोन्ही अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. हे परीक्षा केंद्र तात्पुरते रद्द केले असून विद्यार्थी दुसऱ्या दोन महाविद्यालयांत वर्ग केले आहेत. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या परीक्षेत गडबड होणार नाही. - डॉ. श्याम शिरसाट, प्र-कुलगुरू घडले ते चुकीचेच, चौकशी करू हॉलतिकीट ३० आणि ३१ मे रोजी दिले होते. पण ते डाऊनलोड करताना अडचणी आल्या. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी या केंद्रावर कसे आले, याची चौकशी केली जाईल. घडलेला प्रकार चुकीचाच होता. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. - डॉ. गणेश मंझा, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...