आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्केटिंग:‘जी 20 समिट’साठी औरंगाबादचे मार्केटिंग; एक सोहळा शहरात होण्याची आशा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जी २०’ देशांची शिखर परिषद डिसेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या आठ महिन्यांच्या कालावधीत भारतात हाेणार आहे. यानिमित्ताने सदस्य राष्ट्र असलेल्या २० देशांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, सचिव, राजदूत, इतर विविध अधिकारी आदींचा माेठा लवाजमा भारतात येणार आहे. या काळात देशात तब्बल १८० ठिकाणी विविध परिषदा घेतल्या जातील, त्याला टप्प्याटप्प्याने ही मंडळी उपस्थित राहणार आहेत. या १८० ठिकाणांमध्ये औरंगाबादचाही समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून चाचपणी केली जात आहे. पंतप्रधान कार्यालयातील सचिव यानिमित्ताने जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी औरंगाबादेतील हॉटेल्स, पर्यटनस्थळे व इतर सुविधांची पाहणी केली. स्थानिक अधिकारी व उद्याेजकांनी त्यांच्यासमोर उत्तम प्रेझेंटेशन केले. या प्रयत्नांना यश आल्यास पुढील वर्षात यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक मोठा इव्हेंट आपल्या शहरात होऊ शकतो. भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जर्मनी, जपान, फ्रान्स, इंडोनेशिया, इटली, रशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की आणि युनायटेड किंगडम हे देश ‘जी २०’चे सदस्य आहेत. त्यांना भारताच्या विविध भागांत नेऊन आपल्या देशाची संस्कृती व प्रगती दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने परिषदेचे सचिव एल.के. बाबू व इतर दोन अधिकारी शनिवारी आले होते. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह त्यांनी वेरूळ, अजिंठा लेणीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या २० देशांतील लोकांना सांस्कृतिक कार्यक्रम तसेच हेरिटेज साइटदेखील दाखवण्यात येणार आहेत. इंडस्ट्री, टुरिझम आणि शिक्षणावर प्रभावी प्रेझेंटेशन : रामा इंटरनॅशनलमध्ये प्रशासकीय अधिकारी व उद्योजकांनी समितीसमोर औरंगाबादबाबत प्रेझेंटेशन केले. त्यात खाली मुद्द्यांवर भर देण्यात आला...

औरंगाबादच्या २०० किमी परिघात अजिंठा, वेरूळ, लोणार ही तीन जागतिक वारसास्थळे आहेत. येथील औद्योगिक वसाहत देशातील ३० मध्ये आहे. ३० हजार परदेशी विद्यार्थी दरवर्षी शिक्षणासाठी या शहरात येतात, या मुद्द्यांवर उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी प्रेझेंटेशनमध्ये भर दिला. देशभरातील विविध शहरांची पाहणी पंतप्रधान कार्यालयामार्फत केली जात आहे. आतापर्यंत ३५ शहरांची पाहणी झाली असून औरंगाबाद ३६ व्या क्रमांकाचे शहर आहे. उद्योजक राम भोगले, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत, सीआयआय विभागीय अध्यक्ष प्रसाद कोकीळ, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिष्टमंडळाला शहराची क्षमता पटवून देण्यासाठी अजिंठा, वेरूळ आणि दौलताबादची सैर घडवून आणली. गाइड राजेश राऊत यांनी अजिंठ्याच्या शिल्पांची वैशिष्ट्ये उलगडून सांगितल्यावर अधिकारी चकित झाले. दरवर्षी किती परदेशी पर्यटक भेटी देतात, विमानसेवा कशी आहे याची माहिती जसवंतसिंग यांनी दिली. या परिषदेसाठी प्रामुख्याने टू टियर आणि थ्री टियर शहरांचा विचार केला जाणार आहे. त्रिची आणि गोव्यातही त्यासाठी प्रयत्न होत आहेत. असे असताना पर्यटन व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या औरंगाबादलाही ही संधी मिळू शकते. पंतप्रधान कार्यालयातील सचिवांनी केली शहरातील आदरातिथ्य, पर्यटनस्थळे, सुविधांची पाहणी; जिल्हा प्रशासन-उद्योजकांकडून प्रेझेंटेशन समितीने केली हॉटेल, सभागृहाची पाहणी या तीनसदस्यीय समितीने हॉटेल रामा तसेच लेमन ट्री हॉटेलची पाहणी केली. तसेच एका वेळी २०० पेक्षा जास्त लोक बसू शकतील अशा एमजीएमच्या रुक्मिणी हॉलचीही पाहणी केली. औरंगाबादच्या विकासाला होईल फायदा सीआयआयचे मराठवाडा प्रमुख प्रसाद कोकीळ यांनी सांगितले, आम्ही औरंगाबादच्या बलस्थानांबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली. २० देशांतल्या लोकांना इथे कनेक्टिव्हीटी कशी आहे, पर्यटन- उद्योगाची स्थिती, हॉस्पिटॅलिटीची व्यवस्था, त्यामध्ये असणाऱ्या सुविधांचीही माहिती दिली. या परिषदेसाठी आपल्या शहराची निवड झाल्यास औरंगाबादचे नाव पुन्हा जागतिक पातळीवर जाईल. विदेशातील उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा होऊ शकेल. त्याचा औरंगाबादच्या विकासासाठी फायदाच होईल.

बातम्या आणखी आहेत...