आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:अल्पवयीन मुलीशी विवाह, बळजबरीने संबंध; इंजिनिअर पतीवर ‘पॉक्सो’चा गुन्हा; औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन नाकारला

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीसाेबत विवाह करून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका अभियंत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणाऱ्या अभियंत्याला भादंवि कलम ३७५ (२) नुसार पती-पत्नी नात्याची सूट मिळणार नाही, कारण त्याच्याविरोधात पॉक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे, असे न्या. विभा कंकणवाडी यांनी स्पष्ट केले. भारतीय दंडविधान संहिता व पॉक्सो या दाेन्ही कायद्यांच्या तुलनेत विशेष कायद्याखाली असलेली पॉक्सोची कलमे भादंविच्या (आयपीसी) कलमांना अधिलिखित (प्रभावी) ठरतात, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

सोनई (जि. नगर) येथे कोरोनाकाळात अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्यामुळे एकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. ३ जुलै २०२१ रोजी हा विवाह बळजबरीने लावल्याप्रकरणी आई-वडील, सासू-सासरे आणि पतीवर पॉक्सो, बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता, तर पतीवर बलात्काराचा अतिरिक्त गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुलीने लग्नानंतर दोन महिन्यांनी महिला व बालकल्याण विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. आपले वय १७ वर्षे तीन महिने असून आपले लग्न बळजबरीने लावण्यात आल्याचे तिचे म्हणणे होते.

महिला व बालकल्याण विभागाने प्रकरणाची चौकशी करून पोलिस ठाण्यात प्रकरण पाठवले. पोलिसांनी संबंधित गावच्या ग्रामसेवकाला या प्रकरणात फिर्याद देण्यास सांगितले. प्रारंभी केवळ बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर बालकल्याण विभागाच्या अहवालानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी २०२२ मध्ये अर्ज देत भादंवि कलम ३७६(एन), ३२३, ५०४, ५०६ आणि पॉक्सो कायदा कलम ४, ५ (एल), ६ आणि ८ नुसार गुन्हा दाखल केला.

पीडित मुलीचे आई-वडील, सासू-सासरे आणि पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पती वगळता इतरांना अटकपूर्व जामीन मिळाला. पतीला मात्र सत्र न्यायालयाने जामीन नाकारला. त्यामुळे त्याने खंडपीठात धाव घेतली. सहायक सरकारी वकील वैशाली जाधव पाटील यांनी सामाजिक कायद्यांचे पालन न झाल्यास समाजात अनागोंदी माजेल, याकडे सुनावणीवेळी लक्ष वेधले. इंजिनिअर व्यक्तीच जर अल्पवयीन मुलीसोबत विवाह करीत असेल तर समाज त्याचा काय आदर्श घेईल, असा युक्तिवादही त्यांनी केला. पीडितातर्फे अॅड. कुणाल काळे व अॅड. मंजुश्री नरवडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...