आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:मसिआ टी-20 स्पर्धेत मसिआ, एनआरबी संघाचा विजय, आदर्श जैन, दिनेश पाटील ठरले सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या मसिआ टी-20 क्रिकेट स्पर्धेत एनआरबी आणि मसिआ इलेव्हन संघांनी विजय मिळवला. पहिल्या लढतीत मसिआने बाजाज संघावर 8 गडी राखून मात केली. या सामन्यात आदर्श जैन सामनावीर ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बजाजने 20 षटकांत 8 बाद 102 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात मसिआने 9.4 षटकांत 104 धावा करत विजय साकारला. यात अष्टपैलूू आदर्श जैनने नाबाद अर्धशतक झळकावले. सलामीवीर आदर्शने 31 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 65 धावांची खेळी केली. मनिष अग्रवाल 10 आणि ऋषिकेश तरडे 16 धावांवर परतला. विजय लेकुरवाळेने नाबाद 11 धावा काढल्या. बाजाजकडून राजेश चांदेकर व ऋतूपर्ण कुलकर्णीने प्रत्येकी एकाला टिपले.

तत्पूर्वी, बाजाजकडून सचिन नापतेने सर्वाधिक 32, अक्षय बंडगरने 25, अमेय कामतकरने 10 धावा काढल्या. मसिआकडून मधूर पटेलने अवघ्या 8 धावा देत 3 बळी घेतले. ऋषिकेश तरडे, गिरीश खत्री, हितेश पटेलने प्रत्येकी एक बळी घेतला.

शशिकांत पवारचे अर्धशतक

दुसऱ्या लढतीत एनआरबीने फार्मा स्ट्रायकर्सवर 20 धावांनी विजय मिळवला. यात एनआरबीने 20 षटकांत 9 बाद 145 धावा उभारल्या. यात शशिकांत पवारने 40 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 54 धावा करत अर्धशतक ठोकले. दिनेश पाटीलने 19, महेश निकमने 10, संदीप राठोडने 24 धावा काढल्या. फार्माच्या साई देहळे व सतिश काळुंकेने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. प्रत्युत्तरात फार्मा स्ट्राइकर्सने निर्धारित षटकांत 9 बाद 125 धावा उभारल्या. यात क्षितिज चव्हाणने 22, अनिरुद्ध शास्त्रीने 34, शार्दुल नंदापुरकरने 14 धावा काढल्या. एनआरबीकडून दिनेश पाटीलने भेदक गोलंदाजी करत 11 धावांत 4 बळी घेतले. सचिन शेडगे व व्यंकटेश सोनवलकरने प्रत्येकी 2-2 गडी टिपले.