आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसिआ टी - 20 क्रिकेट:कंबाईन शेंद्रा संघाची मेटलमॅनवर मात, संदीप तुपे सामनावीर ​​​​​​​

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मसिआतर्फे आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत कंम्बाइन शेंद्रा संघाने रोमांकच विजय मिळवला. गरवारे स्टेडियमवर झालेल्या लढतीत कंम्बाइन शेंद्राने मेटलमॅन संघावर २९ धावांनी मात केली. या लढतीत संदीप तुपे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शेंद्राने २० षटकांत ५ बाद १८४ धावा उभारल्या. यात कर्णधार संदीप तुपेने अर्धशतक झळकावले. सलामीवीर संदीप खोसरे ११ धावांवर परतला. दुसरा सलामीवीर संदीप तुपेने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत ४९ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ७० धावांची खेळी केली. प्रविण नागरे ४ धावांवर बाद झाला.

विपुल भोंडेने २९ चेंडूंत ३ चौकारांसह ४० धावा काढल्या. पवन कावळेने १९ चेंडूंत २४ धावा जोडल्या, तर तळातील फलंदाज ओंकार ठाकूर २२ धावांवर नाबाद राहिला. संघाला १३ धावा अतिरिक्त मिळाल्या. मेटलमॅनकडून गोरख घोटेकरने ३१ चेंडूंत ३ गडी बाद केले. सुरज वाघ व अविष्कार नन्नवरेने प्रत्येकी एक एक गडी टिपला.

सुरज वाघचे अर्धशतक व्यर्थ

प्रत्युत्तरात मेटलमॅन निर्धारित षटकांत ५ बाद १५५ धावा उभारल्या. सलामीवीर मयुर देशमुखने १० धावा जोडल्या. मनोज ताजीने १५ धावा केल्या. सुरज वाघने अर्धशतक केले. मात्र संघाचा पराभव झाल्याने त्याचे अर्धशतक व्यर्थ गेले. त्याने ५० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६८ धावांची खेळी केली. सौरभ बदाडेने १९ आणि राजकुमार माळीने नाबाद ११ धावा काढल्या. शेंद्राकडून भुपेश देशमुख, संदीप खोसरे, नागनाथ तेली यंानी प्रत्येकी एक एक गडी बाद केला.