आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसिआ टी-20 क्रिकेट स्पर्धा:कॉस्मो संघाचा दणदणीत विजय; एनआरबी संघाचा पराभव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मसिआच्या वतीने आयोजित टी-20 क्रिकेट स्पर्धेत कॉस्मो संघाने दणदणीत विजय मिळवला. शनिवारी गरवारे स्टेडियमवर झालेल्या लढतीत काॅस्मोने एनआरबी संघावर 76 धावांनी मात केली. या लढतीत रोहन हंडीबाग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कॉस्मोने 20 षटकांत सर्वबाद 135 धावा उभारल्या. यात संघाची आघाडी फळी अपयशी ठरली. सलामीवीर दीपक सिंगारे 11 धावांवर परतला. त्यानंतर विराज चितळे (1), सतिश भुजंगे (1), अतुल घोडके (1) हे तिन्ही फलंदाज आल्यापावली तंबूत परतले. अनिकेत जाधव भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर आलेल्या सनी राजपूत व भास्कर जीवरग जोडीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

या जोडीने सहाव्या गड्यासाठी 92 धावांची महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सनीने 46 चेंडूंत 6 चौकार खेचत सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. भास्करने 33 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 1 षटकार लगावत 40 धावा ठोकल्या. कर्णधार रोहन हंडीबाग अवघ्या 4 धावांवर परतला. संदीप राठोडने त्याला पायचित केले. एनआरबीकडून संदीप राठोडेने 25 धावा देत 4 गडी बाद केले. व्यंकटेश सोनवलकरने 21 धावांत 3 बळी घेतले. सचिन शेडगेने एकाला टिपले.

रोहनची भेदक गोलंदाजी

प्रत्युत्तरात एनआरबीचा डाव 13 षटकांत अवघ्या 59 धावांवर संपुष्टात आला. यात सलामीवीर संदीप राठोडने 10 व कर्णधार विनोद लांबेने 9 धावा केल्या. सचिन शेडगे 4 व शशिकांत पवार 6 धावांवर परतले. दिनेश पाटील व रामेश्वर मतसागर भोपळाही फोडू शकला नाही. महेश निकमने सर्वाधिक 11 धावा केल्या. इतर फलंदाज अपयशी ठरले. कॉस्मोकडून रोहन हंडीबागने 19 धावा देत 5 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. विराज चितळेने 2 व अनिकेत जाधवने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...