आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ब्रेकिंग:निसर्गाची माया : धरणे भरली, पण रिक्त पदांचा दुष्काळ ; गोदावरी मराठवाडा पाटबंधारेत 7146 पैकी 4958 जागा रिक्त

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंचनावर प्रश्नचिन्ह, जलसंपदात ७०% जागा रिक्त

यंदाच्या समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यातील लहानमोठे ९६४ सिंचन प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, निसर्गाने भरभरून दिलेले पाण्याचे दान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे आव्हान सिंचन खात्याला पेलावे लागणार आहे. त्याचे कारण म्हणजे जलसंपदा खात्यात रिक्त पदांची मोठी समस्या असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळातील ७,१४६ पदांपैकी तब्बल ७० टक्के म्हणजे ४,९५८ पदे रिक्त आहेत. उर्वरित २,१८८ कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अपुरे असल्याने येणाऱ्या रब्बी हंगामात सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.

यंदा मांजरा वगळता मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न दुधना, निम्न मानार ही मोठी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. विभागातील मोठ्या ४५ धरणांत ७३ %, ८१ मध्यम प्रकल्पांत ५१ % तर ८३८ लघु प्रकल्पांत २६ % पाणीसाठा आहे. लहानमोठ्या ९६४ प्रकल्पांत ५८ % पाणीसाठा झाला आहे. अशा स्थितीत जलसंपदा विभागाने काटेकोरपणे सिंचन व्यवस्थापन केल्यास येणारा रब्बी हंगाम शेतकऱ्यांना वरदान ठरू शकतो. परंतु सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित पदेच रिक्त असल्याने धरणांतील पाणी शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे, असा प्रश्न जलसंपदा विभागासमोर आहे.

गटनिहाय मंजूर पदे, रिक्त पदे
गट-अ

  • अधीक्षक अभियंता : ४ : २
  • कार्यकारी अभियंता : २२ : ९
  • उपविभागीय अभियंता, सहायक अभियंता : १४३ : ६४
  • एकूण : १६९ : ७५

गट -ब

  • शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांची : ७६७ : ३९९

गट -क

  • दप्तर कारकून, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मोजणीदार, कालवा निरीक्षक, वाहनचालक, संदेशक, दप्तर कारकून : ५,०३२ : ३,७५६

गट -ड

  • कालवा टपाली, चौकीदार : ११७८ : ७२८ { एकूण : ७१४६ : ४९५८

कंत्राटी पद्धतीने भरण्याचा प्रस्ताव
सिंचन व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी किमान पदे कंत्राटी पद्धतीने भरावीत, असा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शासनस्तरावरही काही प्रश्न आहेत. शासन याबाबत योग्य तो निर्णय घेईल. - एन. व्ही. शिंदे, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

रिक्त पदांचा दुष्काळ
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत औरंगाबाद, बीड, नांदेड व नाशिक येथे अधीक्षक अभियंत्यांची कार्यालये आहेत. तिन्ही कार्यालयांची मिळून एकूण मंजूर ७१४६ पैकी ४९५८ (६९.३८ %) पदे रिक्त असल्याचे गोपनीय अहवालातून समोर आले.