आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीए क्रिकेट:छत्रपती संभाजीनगरने 163 धावांनी मोठा विजय, यशोधा घोगरेचे 8 बळी, सिंधुदुर्ग संघाला हरवले

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित 19 वर्षाखालील महिला निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत यजमान छत्रपती संभाजीनगरच्या संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला. एमजीएम स्पोर्टस क्लबवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात यशोधा घोगरेच्या (22 धावा, 8 बळी) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर छत्रपती संभाजीनगरने सिंधुदुर्गवर 163 धावांनी मात केली. या लढतीत यशोधा घोगरे सामनावीर ठरली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान छत्रपती संभाजीनगरने 50 षटकांत 8 बाद 189 धावा उभारल्या. यात सलामीवीर जिया सिंगने 40 चेंडूंत 7 चौकार खेचत सर्वाधिक 36 धावा काढल्या. दुसरी सलामीवीर प्रिया राजपूत अवघ्या 6 धावांवर बाद झाली. अष्टपैलू यशोधा घोगरेने 30 चेंडूंत 2 चौकारांसह 22 धावा केल्या. रुपाली जाधवने 17 धावा जोडल्या. काव्या गुळवे 3, श्रृष्टी पवा 4 व हंसिका शर्मा 8 धावांवर परतल्या. कर्णधार भुमिका चव्हाण 12 धावा करु शकली. तळातील फलंदाज शर्वनी खडकेने संयमी फलंदाजी करत 63 चेंडूंत 1 चौकार लगावत नाबाद 27 धावांचे योगदान दिले. पुजा जमधडेने 44 चेंडूंत 1 चौकारांसह नाबाद 25 धावा करत संघाला पावणे दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. सिंधुदुर्गकडून समृद्धी जोशीलकरने 33 धावांत 4 बळी घेतले. अनुष्का अंबेकर व तन्वी सारकरने प्रत्येकी एकाला टिपले.

यशोधाची भेदक गोलंदाजी

प्रत्युत्तरात यशोधा घोगरेच्या भेदक गोलंदाजी पुढे सिंधुदुर्गचा संघा अवघ्या 26 धावांवर ढेपाळला. त्याचे तब्बल 7 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. कर्णधार अनुष्का अंबेकरने सर्वाधिक 11 धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. यशोधाने ६ षटकांत अवघ्या 7 धावा देत 8 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिने 3 षटके निर्धावदेखील टाकली. पुजा जमधडेने 18 धावांत 2 गडी बाद केले.