आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीए क्रिकेट:भूमिका - काव्याची दीडशतकी भागीदारी, छत्रपती संभाजीनगरचा विजय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १९ वर्षाखालील निमंत्रित महिलांच्या वनडे क्रिकेट स्पर्धेत कर्णधार भुमिका चव्हाण व काव्या गुलवेच्या दीडशतकी भागीदारच्या जोरावर छत्रपती संभाजीनगरच्या संघाने मोठा विजय मिळवला. एमजीएम स्पोर्ट््स क्लबवर झालेल्या सामन्यात यजमान संघाने विजय सीसी संघावर १२५ धावांनी मात केली. या लढतीत भुमिका चव्हाण (९३ धावा, ६ बळी) सामनावीर ठरली.

नाणेफेक जिंकून छत्रपती संभाजीनगरने ५० षटकांत ५ बाद २४५ धावा उभारल्या. यात सलामीवीर प्रिया राजपूतने ३२ चेंडूंत ४ चौकारांसह २३ धावा केल्या. दुसरी सलामीवीर जिया सिंगने २८ चेंडूंत ४ चौकारांसह २१ धावा जोडल्या. रुपाली जाधव ३ धावांवर परतली. काव्या गुळवेने संयमी फलंदाजी करत १०७ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार खेचत ६८ धावा काढल्या. यशोदा घोगरेने ११ धावा करु शकली. कर्णधार भुमिका चव्हाणने शानदार अर्धशतक झळावले. तिने १११ चेंडूंत १४ चौकार लगावत ९३ धावांची खेळी केली. विजयकडून श्रावणी बहिरटने ४२ धावा करत ३ गडी बाद केले. शिवाणी यादवने एकाला टिपले.

भूमिकाची अष्टपैलू कामगिरी

प्रत्युत्तरात विजय सीसी संघाचा डाव ३६.३ षटकांत सर्वबाद १२० धावांवर ढेपाळला. यात कर्णधार शिवानी यादवने ५० चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ४७ धावा काढल्या. त्यांचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. सारंगी मपुसकरने १६ आणि क्षीतिजा लोमटेने १० धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यजमान संघाची कर्णधार भुमिकाने फलंदाजी नंतर गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत अर्धे डजन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यशोदा घोगरेने २ आणि पुजा जमधडे व प्रिया राजपूतने प्रत्येकी एकाला टिपले.