आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वरिष्ठ गट निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर आणि किंग्ज स्पोर्ट्स क्लब यांच्यातील सामना बरोबरीत राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर किंग्ज स्पोर्ट्सला विजयी ठरवण्यात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम खेळताना पहिल्या डावात छत्रपती संभाजीनगरने ८७.१ षटकांत सर्वबाद २९३ धावा उभारल्या. यात कर्णधार स्वप्निल चव्हाणने ११० चेंडूंत ७ चौकारांसह ४६ धावा केल्या. ऋषिकेश सपकाळने ४४ धावा काढल्या. शशिकांत पवारने १०७ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचत ७६ धावांची खेळी केली. त्याला साथ देत विश्वजीत राजपूतनेही अर्धशतक झळकावले. त्याने ७७ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५७ धावांचे योगदान दिले. ऋषिकेश नायर २९ धावांवर परतला. किंग्जच्या अन्सार अझहर अहमदने ५ आणि कर्णधार अभिजित साळवीने ४ गडी बाद केले.
किंग्जचा कर्णधार ठरला किंग
पहिल्या डावात किंग्ज स्पोर्ट्सने ६८.३ षटकांत सर्वबाद ३५० धावा उभारल्या. यजमान संघाविरुद्ध ५७ धावांची आघाडी घेतली होती. यात कर्णधार अभिजित साळवीने शतक झळकावत कर्णधारापदाला साजेशी खेळी केली. त्याने १८१ चेंडूंत २३ चौकार व २ षटकार खेचत १५८ धावा उभारल्या.
पियुष सोहनेने ६७ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ५२ धावा केल्या. सिद्धेश वरघंटेने ४०, आदित्य कदमने २८, अन्सारी अझहर अहमदने ३९ धावा केल्या. छत्रपती संभाजीनगरच्या कार्तिक बालय्या व स्वप्निल चव्हाणने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.
मुकिमची चमकदार खेळी
दुसऱ्या डावात छत्रपती संभाजीनगरने १९ षटकांत ४ गडी गमावत १०४ धावा काढल्या. स्फोटक सलामीवीर मुकिम शेखने अर्धशतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार व १ षटकार खेचत नाबाद ७६ धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर आकाश बोराडे ७, कर्णधार स्वप्निल चव्हाण २ धावांवर बाद झाले. ऋषिकेश सपकाळ १९ धावांवर नाबाद राहिला. कुणाल थोरातने २ व प्रसाद अभ्यंकरने एक गडी बाद केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.