आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MCA 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा:औरंगाबादची नांदेड संघावर मात, मो. अलीचे 7 बळी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत यजमान औरंगाबाद संघाने नांदेडवर एक डाव व 114 धावांनी मोठा विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी करणारा मो. अली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

फुलंब्री तालुक्यातील पाल येथील एचएसजे स्टेडियवर झालेल्या लढतील प्रथम खेळताना औरंगाबादने पहिल्या डावात 65 षटकांत 215 धावा उभारल्या. यात सलामीवीर आदित्य शिंदेने ३६ धावा काढल्या. कर्णधार श्लोक गिरगेने 19 व आकाश शेळकने 10 धावा केल्या. सोहम नरवडेने 26 आणि प्रेम पवारने 25 धावा जोडल्या.

तळातील फलंदाज मो. अलीने सर्वाधिक 41 धावा ठोकत संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिला. शाश्वत पुराणीक 19 धावांवर नाबाद राहिला. नांदेडकडून एस. सोनवणेने 6 गडी बाद केले. ऋषिकेश, सुधाकर राठोडने प्रत्येकी एकाला टिपले.

नांदेड अवघ्या 28 धावांत ढेर

पहिल्या डावात नांदेडचा डाव 26.5 षटकांत अवघ्या 28 धावांत संपुष्टात आला. औरंगाबादने 187 धावांची आघाडी घेतली. यात एकाही फलंदजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. औरंगाबादकडून अभिराम गोसावी व आकाश शेळकेने प्रत्येकी 2 गडी बाद केले. मो. अलीने अवघ्या 2 धावा देत 4 फलंदाज तंबूत पाठवले. श्रेयस जोशी व प्रेम पवारने 1-1 गडी टिपला.

फॉलोऑनंतरही नांदेड अपयशी

पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर नांदेडला फॉलोऑन मिळाला. दुसऱ्या डावात देखील नांदेडचा संघ 40.4 षटकांत 71 धावांवर ढेपाळला. यात सलामीवीर ए. जगतापने 15, वेदांत कलीकरने 12 धावा केल्या. सुधाकर राठोडने 14 धावा जोडल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. त्यांना दुहेरी धावसंख्याही करता आली नाही. औरंगाबादच्या अभिराम गोसावी व श्रेयस जोशीने प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. शाश्वत पुराणीकने 22 धावा देत 4 फलंदाज तंबूत पाठवले. तसेच फलंदाजीत कमाल कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू मो. अलीने 15 धावा देत 7 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...