आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमसीए क्रिकेट स्पर्धा:हिंगोलीची छत्रपती संभाजीनगर संघावर 108 धावांची आघाडी, शुभम जाधव व स्वप्निल चव्हाणची फिफ्टी

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित वरिष्ठ निमंत्रितांच्या लीग स्पर्धेत हिंगोली संघाने यजमान छत्रपती संभाजीनगरच्या संघावर १०८ धावांनी आघाडी घेतली.

जिल्हा संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हिंगोलीने पहिल्या डावात ३५.५ षटकांत सर्वबाद १५६ धावा काढल्या. यात सलामीवीर तथा कर्णधार शुभम जाधवने अर्धशतक झळकावले. त्याने ५० चेंडूंचा सामना करताना ११ चौकार खेचत ५३ धावांची खेळी केली. सॅडी पाटीलने १५ धावा काढल्या. राहुल देशमुख २, संतोष मुधवा १० व प्रतिक बाेधगिरे १७ धावांवर परतला.

समर्थ निकम व हर्ष सिंग भोपळाही फोडू शकले नाही. विराज जमदाडेने ३५ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार लगावत ३६ धावा जोडल्या. छत्रपती संभाजीनगरच्या ऋषिकेश नायरने ३५ धावा देत ४ आणि ऋषिकेश कुंडेने १३ धावा देत ३ गडी बाद केले.

छत्रपती संभाजीनगर पिछाडीवर

प्रत्युत्तरात कर्णधार स्वप्निल चव्हाणच्या (५०) अर्धशतकाच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर संघाचा पहिला डाव अवघ्या १३९ धावांवर संपुष्टात आला. संघ १७ धावांवर पिछाडीवर पडला. संघातील केवळ तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. स्वप्निल चव्हाणने ३६ चेंडूंत ९ चौकारांसह सर्वाधिक ५० धावा काढल्या. ओंकारने २४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार मारत ३७ धावा केल्या. ऋषिकेश कुंडे १५ धावांवर परतला. इतर फलंदाजांनी निराशा केली. मुकिम शेख ६ धावांवर बाद झाला, तर आकाश बोराडे शुन्यावर परतला.

हिंगोलीची दुसऱ्या डावात चांगली सुरूवात

हिंगोलीने पहिल्या दिवस अखेर दुसऱ्या डावात २३ षटकांत १ बाद ९१ धावा करत एकूण १०८ धावांची आघाडी घेतली. शुभम जाधव ६५ चेंडूंत ६ चौकारांसह ३६ धावांवर खेळत आहे. सॅडी पाटील १९ धावांवर परतला. राहुल देशमुख ५१ चेंडूंत ५ चौकार खेचत नाबाद ३१ धावांवर खेळत आहे. हिंगोलीच्या ऋषिकेश कुंडेने एकाला टिपले.

बातम्या आणखी आहेत...