आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:​​​​​​​एमसीव्हीसी अभ्यासक्रम बंद, "आयटीआय’मध्ये समाविष्ट; 53 तंत्र माध्यमिक शाळा, 322 तुकड्यांचे रूपांतर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली

केंद्र शासनाकडून एमसीव्हीसी अभ्यासक्रमातील बांधकाम, यंत्रसामग्री यासाठी एक वेळेचे अनुदान दिले जात असताना अनुदान बंद करण्यात आले. या खर्चाचा भार राज्य शासनावर येत आहे. यासोबतच प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाहिजे तशा नोकऱ्या मिळत नाहीत. यामुळे शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील एमसीव्हीसी अभ्यासक्रमाचे रूपांतर आता आयटीआयच्या शिल्प कारागीरमध्ये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

केंद्र शासनाच्या १९८६ च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार १० + २ स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन युवकांना रोजगार, स्वयंरोजगारक्षम बनविणे आणि उच्च शिक्षणावरील भार कमी करण्याच्या दृष्टीने १९८८-८९ पासून केंद्र सहायता योजनेंतर्गत ७० टक्के व्यवसाय शिक्षण, ३० टक्के सामान्य शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली होती. या अंतर्गत राज्यात ५३ शासकीय संस्थांमध्ये ११ व १२ वी साठी १६१ तुकड्या मंजूर करण्यात आलेल्या आहे. दरम्यान, एमसीव्हीसी या योजनेच्या नावात एचएससी व्होकेशनल असा बदल २ मार्च २००९ रोजी करण्यात आला. तसेच नवीन सुधारित अभ्यासक्रम २०१४-२०१५ पासून लागू करण्यात आला.

अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली
मागील काही शैक्षणिक वर्षांमध्ये उच्च माध्यमिक व्यवसाय (एचएससी व्होकेशनल) योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमतेच्या उपलब्ध सुविधांपैकी ५० टक्क्यांहून कमी सुविधांचा प्रत्यक्ष उपयोग करण्यात आला. तसेच प्रवेश क्षमतेच्या तुलनेत कमी होणारे प्रवेश, मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रमाला लागलेली विद्यार्थ्यांची गळती, तसेच खर्च करूनही पाहिजे तसा उपयोग या अभ्यासक्रम राबवून होत नव्हता. केंद्र शासनाने शिकाऊ उमेदवारीअंतर्गत व्होकेशनल टेक्निशियन उपलब्ध करून दिले असताना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. या तुलनेत आयटीआयच्या शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेला प्रतिसाद जास्त आहे. त्यामुळे एचएससी व्होकेशनल अभ्यासक्रमातील विद्यार्थी रोजगाराच्या संधी मिळवण्यात मागे पडत आहेत. याचा विचार करता शासनाने सदरील अभ्यासक्रम शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेत रूपांतर केल्यास रोजगार उपलब्ध होतील.

५३ संस्थेतील ३२२ तुकड्यांचा समावेश
५३ शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्लस २ स्तरावरील अभ्यासक्रमांच्या मंजूर असलेल्या ३२२ तुकड्यांचे रूपांतर करण्यात येत आहे. दरम्यान, यंदाच्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात बारावी व्होकेशनसाठी अकरावीत प्रवेश देऊ नये, असा आदेश असून यावर्षी १६१ तुकड्या, तर पुढील वर्षांत १६१ तुकड्या रूपांतरित होणार आहेत. ज्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, येथील तुकड्या यंदा रूपांतरित होत आहेत.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना फायदा
यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एचएससी व्होकेशनल कोर्सेस बंद होऊन आयटीआयत समाविष्ट होणार आहे. यामुळे आयटीआयच्या जागांमध्ये वाढ होऊन विद्यार्थ्यांना फायदा होईल. - जी. बी. दंडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी

बातम्या आणखी आहेत...