आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पशुपैदास प्रक्षेत्राच्या 25 एकर जागेवर होणार वैद्यकिय महाविद्यालय, खासदार सातवांच्या पाठपुराव्यानंतर पथकाकडून पाहणी

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोलीत पशुपैदास प्रक्षेत्राच्या २५ एकर जागेवर लवकरच वैद्यकिय महाविद्यालयाची उभारणी होणार असून त्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. ४ हिंगोलीत पाहणी केली. खासदार ॲड. राजीव सातव यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.

हिंगोली येथे वैद्यकिय महाविद्यालय नसल्यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यातच आता गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी लिगोची अंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेची उभारणी होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालय सुरु व्हावे अशी अपेक्षा नागरीकांतून व्यक्त केली जात होता. त्यानंतर खासदार ॲड. राजीव सातव यांनी राज्यस्तरावर पालकमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन हिंगोलीत वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याबाबत मागणी मांडली. यावेळी आमदार राजू नवघरे, विलास गोरे, प्रशांत गायकवाड यांचीही उपस्थिती होती. यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यानंतर आज नांदेड येथील वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. विवेेक सहस्त्रबुध्दे, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. समीर मोहमद यांच्या पथकाने हिंगोलीत येऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे, डी. एस. चौधरी यांची उपस्थिती होती.

या पथकाने शासकिय रुग्णालयातील अंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग त्या ठिकाणी उपचारासाठी येणारे रुग्ण, रुग्णालयातील यंत्रसामुग्री याची पाहणी केली. या शिवाय जागेचीही पाहणी केली. त्यानंतर या पथकाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पशुपैदास प्रक्षेत्राची २५ एकर जागा देण्यास मान्यता दिली आहे. या पथकाने हिंगोलीतील सविस्तर माहिती तसेच उपलब्ध जागा, शासकिय रुग्णालयातील सुविधा याबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला अाहे. सदर अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, राज्य शासनाने तातडीने पाठविलेल्या या पथकामुळे हिंगोलीत लवकरच वैद्यकिय महाविद्यालयाची उभारणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser