आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेचे चक्रव्युह:गुन्हेगारांना नशेच्या गोळ्या देणारा मेडिकल चालक, 2 एजंट अटकेत ; वैजापूर ते गेवराई तांड्यापर्यंत पसरले नशेचे जाळे

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील काही मेडिकल चालकच रेकॉर्डवरील गुन्हेगारांमार्फत तरुणांना नशेची औषधी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नशेचे हे महाजाल केवळ शहरापुरते मर्यादित नसून वैजापूरपासून गेवराई तांड्यापर्यंत पसरले आहे. दोन्ही गावांतील मध्यभागी असलेल्या वाळूज परिसरातील तीन मेडिकल चालकांची नावे यात समोर आली. विशेष पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई करत एक मेडिकल चालक, तर दोन एजंटला अटक करून त्यांच्याकडून नशेच्या २०४८ गोळ्या, अवैधरीत्या विकण्यासाठी आणलेल्या व्हायग्रा आणि गर्भपाताच्या किट जप्त केल्या. १७ जून रोजी सहायक निरीक्षक मोहसीन सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार भंडारे यांना पंढरपूर परिसरातील मेडिकल चालकांकडून गोळ्या विकल्या जात असून त्या गेवराई तांडा परिसरातील तरुण सेवन करत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने डमी ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून लांजी रोडवर तारासिंग जगदीशसिंग टाक (२०) यास गोळ्या विकण्याच्या तयारीत असताना पकडले. त्याच्याकडे २४८ गोळ‌्या सापडल्या. रेकॉर्डवरील गुन्हेगार तारासिंग शस्त्रांना धार लावण्याचे काम करतो. आठ दिवसांपूर्वीच तो चिकलठाण्यातील घरफोडीच्या आरोपातून जामिनावर सुटला होता. त्यानंतर लगेच त्याने नशेच्या गोळ्या विकणे सुरू केले. त्याने आधी लांजी रोडवरील शिव मेडिकलचे नाव घेतले. पथकाने तत्काळ मेडिकलचा मालक शिवप्रसाद सुरेश चनघटे (२४) याची चौकशी सुरू केली. त्याच्याकडे७५ गोळ्या सापडल्या. एका मेडिकल एजन्सीवर काम करणारा महेश उनवणे (२९) या गोळ्या पुरवत असल्याचे सांगताच पथकाने रात्रीतून त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे १७२५ गोळया होत्या. तिघांकडून नशेच्या २०४८ अल्फाईलोम, ३ हजार ७१२ सिल्डनाफिल गोळ्या, तर २२८ एमटीपी किट जप्त करण्यात आल्या. एका मेडिकलमध्ये साठा सापडला नाहीच : टाकने चौकशीत शिव मेडिकलसह लांजी रोडवरील तनुजा मेडिकल तसेच वाळूज-पंढरपूर येथील लाइफलाइन मेडिकलचा चालकदेखील गोळ्या विकत असल्याची कबुली दिली. कारवाईनंतर तनुजा मेडिकलचा सुनील रेड्डी गायब झाला, तर लाइफलाइन औषधांचा साठा न सापडल्याने कारवाई करता आली नाही. गुन्हे शाखेचे गौतम पातारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मोहसीन सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक नंदकुमार भंडारे, अंमलदार सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहूळ, प्राजक्ता वाघमारे, दत्ता दुभाळकर यांनी अन्न औषधी निरीक्षक बळीराम मरेवाड, अंजली मिटकर यांच्या मदतीने ही कारवाई केली.

वैजापुरातील बड्या मेडिकल एजन्सीचे नाव समोर यापूर्वी उस्मानपुरा पोलिसांनी एका एजन्सीवर काम करणाऱ्याला नशेच्या गोळ्यांची विक्री अटक केली होती. त्या एजन्सी चालकावर कारवाई करत परवाना रद्द केला होता. त्यानंतर तीन मेडिकल चालक, एक एजन्सीवरील कर्मचाऱ्याशिवाय वैजापूरच्या बड्या मेडिकल एजन्सीचे नाव समोर आले. आरोपी महेश उनवणे याने वैजापुरातील रॅकेटविषयी माहिती दिली. औषधी प्रशासनाचे ग्रामीण भागात दुर्लक्ष असल्याने तेथून सर्रास हे प्रकार चालत असल्याचे सूत्रांनी सांगितले. वैजापूरच्या मेडिकल व्यावसायिकांनीदेखील दोन-अडीच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...