आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकाे चॅम्पियनशिप:टी 20 क्रिकेटमध्ये एनजे व्हिक्टर्सकडून आयकॉन संघाचा पराभव

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेडिको टी-२० चॅम्पियनशिपमध्ये एनजे व्हिक्टर्स संघाने शानदार विजय मिळवला. एमआयटी मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात व्हिक्टर्सने आयकॉन संघावर २० धावांनी मात केली. या लढतीत शतकवीर इम्रान पटेल सामनावीर ठरला.

प्रथम फलंदाजी करताना व्हिक्टर्सने १५ षटकांत २ बाद १६३ धावा उभारल्या. या संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मशुदुल सईद अवघ्या एका धावेवर परतला. दुसरा सलामवीर इम्रान पटेलने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत शानदार शतक ठोकले. त्याने ५४ चेंडूंचा सामना करताना ११ सणसणीत चौकार व ८ षटकार खेचत नाबाद ११३ धावांची खेळी केली. सय्यद रेहानने २१ चेंडूंत ३ चौकारांसह २५ धावा केल्या. कय्युमने १० चेंडूंत १ चौकार व १ षटकार लगावत नाबाद १५ धावा जोडल्या. आयकॉनचा अनिरुद्ध शास्त्री व खालेद कादरीने प्रत्येकी एकाला टिपले.

प्रत्युत्तरात आयकॉनचा डाव १४.४ षटकांत १४३ धावांवर संपुष्टात आला. यात खालेद कादरीच्या ४८ आणि विनोद यादवच्या ४५ धावा वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. कर्णधार अनिरुद्ध शास्त्री १५ धावा करु शकला. व्हिक्टर्सकडून मशुदुल सईद, इम्रान पटेल, विक्की व खालेद बदाम यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

गायत्रीने अल फैसला हरवले

दुसऱ्या लढतीत गायत्री संघाने अल फैज वॉरियर्स संघावर ५ गडी राखून मात केली. प्रथम खेळताना अल फैजने १५ षटकांत ८ बाद १०७ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात गायत्री संघाने १४.५ षटकांत ५ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात पांडूरंग गाजेने ४२ चेंडूंत ५२ धावा करत अर्धशतक ठोकले. ज्ञानेश्वर बनकरने १४ व शिवाजी झिंझुर्डेने १० धावा केल्या.