आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा खंडित:कांचनवाडी प्रकल्पाबाबत 20 डिसेंबर रोजी बैठक ; दोन महिन्यांपासून प्रक्रिया बंद

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांचनवाडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प वीज खंडित केल्याने दोन महिन्यांपासून बंद आहे. याबाबत ठेकेदाराला वारंवार नोटीस देऊनही त्याने कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मनपाने ठेकेदार असलेल्या इंदूरच्या बँको सर्व्हिसेसला नोटीस काढली असून याबाबत २० डिसेंबरला अंतिम बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कांचनवाडी येथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा ३० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. मात्र, त्यातून ना बायोगॅस मिळतो, ना वीज मिळते. तरीदेखील या प्रक्रिया केंद्रासाठी शहरातील सुमारे २० मेट्रिक टन ओला कचरा पुरवला जातो. इंदूरच्या बँको सर्व्हिसेसकडून हा प्रकल्प राबवण्याच्या दृष्टीने पाहिजे त्या पद्धतीने कार्यवाही केली जात नसल्याचे समाेर आले आहे. कांचनवाडी प्रक्रिया केंद्राचे सुमारे ५ ते १० लाखांचे वीज बिल थकले आहे. हे वीज बिल बँको सर्व्हिसेसने भरले नसल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी कांचनवाडी प्रक्रिया केंद्राचा वीजपुरवठा तोडण्यात आला.

मनपाच्या घनकचरा विभागाने बँको सर्व्हिसेस एजन्सीला आतापर्यंत तीनदा नोटिसा बजावल्या आहेत. तरीदेखील बँकोने प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही. घनकचरा विभागाने ५ डिसेंबर रोजी बँको सर्व्हिसेस एजन्सीला आपल्यासोबत मनपाने केलेला करार का रद्द करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली असून एका महिन्याच्या आत मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर येऊन खुलासा सादर करावा, असे नोटिसीत म्हटले आहे.

मनपाकडून कंत्राट रद्द होण्याची शक्यता मनपाने गेल्या दोन महिन्यांत बजावलेल्या कुठल्याच नोटिसीला बँकोने उत्तर दिले नाही. २० डिसेंबरच्या बैठकीलाही हा कंत्राटदार येतो की नाही, अशी शंका आहे. या बैठकीला ठेकेदार उपस्थित राहिला नाही तर त्याचे कंत्राट रद्द होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...