आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्सूल पोलिसांची कारवाई:मैत्रिणीसोबत मिळून लूटमार करणाऱ्या मेहदी गँगच्या कुख्यात गुन्हेगाराला बीडमधून अटक, अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या पोलिसाच्या मुलीची गुन्हेगारासोबत मैत्री

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या पोलिसाच्या मुलीने कुख्यात गुन्हेगार मेहदी गँगचा सदस्य सय्यद फैसल ऊर्फ तेजा भाईसोबत मिळून पैशांच्या व्यवहारातून लूटमार केली होती. शहरातील विविध पोलिस ठाण्यांत ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या फैसलला हर्सूल पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बीड परिसरातील एका नाल्याच्या बाजूला नशा करतानाच मुसक्या आवळून अटक केली. मात्र, त्याची मैत्रिण राखी मुरमुरे फरार असून पोलिस तिचा शोधही घेत आहेत.

हर्सूल परिसरातील चेतनानगरातील प्रतिभा पुरुषोत्तम सोनवणेचा मुलगा महेशची राखीसोबत ओळख होती. सय्यद फैसलने महेशला राखीचे त्याच्याकडील असलेल्या दहा हजारांची मागणी केली होती. मात्र, महेशने राखीचे माझ्याकडे कुठलेच पैसे नसून वारंवार कॉल करू नकाे, असे स्पष्ट बजावले. सय्यद व राखीने ४ मार्च रोजी घरी जाऊन चाकूचा धाक दाखवत सोनवणेंची दुचाकी घेऊन गेले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करताच मारहाण करून चाकूने मारण्याची धमकी दिली. पैसे दिल्यानंतरच दुचाकी मिळेल, असा सय्यद व राखीने दम दिला.

पोलिसांच्या भीतीने बीडमध्ये लपला
अनेक गुन्ह्यांत पोलिस त्याच्या मागावर होते. आणखी नव्या गुन्ह्यामुळे फैसल बीडमध्ये जाऊन लपला. निरीक्षक अमोल देवकर, उपनिरीक्षक रफिक शेख त्याचा शोध घेत होते. त्यांना खबऱ्याकडून बीडमधील बारशी रोडवर फैसल राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शेख, अंमलदार शिवाजी शिंदे, राकेश देशमुख, देवचंद मेहेर यांनी बीड गाठले. तेथे जाऊन स्थानिक पोलिस व खबऱ्यांमार्फत साध्या कपड्यांत शोध सुरू केला. तेव्हा नाल्याच्या बाजूला तो टवाळखोरांसोबत नशा करताना दिसला.

जामिनावर सुटताच गुन्हे करण्यास सुरू
शहरात यापूर्वी तरुणी, महिला गुन्हेगारांच्या संपर्कात जाऊन गुन्हे करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आता पुन्हा एक सुशिक्षित कुटुंबातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी तरुणी गुन्हेगाराच्या संपर्कात आल्याची बाब समोर आली आहे. मूळ नांदेड येथील राखीचे वडील नांदेड पोलिस दलात कार्यरत आहेत. तिने साताऱ्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र, नंतर ती फैसलच्या संपर्कात आली. फैसलची यापूर्वी अनेकदा हर्सूल कारागृहात रवानगी झाली होती. मात्र, जामिनावर सुटताच त्याचे गुन्हे सुरू होतात. त्याच्यासोबत राखीची मैत्री झाली व थेट लूटमारीचा गुन्हा केला.

इम्रान मेहदीला पळवून नेण्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार, १२ गुन्हे दाखल :
२०१८ मध्ये कुख्यात गुन्हेगार इम्रान मेहदीला हर्सूल कारागृहातून न्यायालयात नेताना पोलिसांवर गोळीबार करून पळवून लावण्याचा कट त्याच्या गँगने रचला होता. त्याचा फैसल मुख्य सूत्रधार होता. त्या कटात तेव्हा त्याला अटक केली होती. एकूण ९ गुन्ह्यांसह २०२२ मध्ये त्याच्यावर तीन गुन्हे दाखल झाले. त्या सर्व गुन्ह्यांत पोलिस त्याचा शोध घेत होते.

बातम्या आणखी आहेत...