आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ल्यात व्यापाऱ्याचा मृत्यू:निवडणूक वादातून हल्ल्यात व्यापाऱ्याचा मृत्यू; 9 जणांना 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सात वर्षांपूर्वी झालेल्या मनपा निवडणुकीत पराभूत झाल्याच्या रागातून पराभूत उमेदवारासह काही जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश टी.जी. मिटकरी यांनी गुरुवारी नऊ आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली एकूण एक लाख ८० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

नारायण लहानप्पा पारटकर (३५), भीमाशंकर विष्‍णू कोरडे (३०), दिगंबर सहदेव वैराळ (३२), विशाल ज्ञानोबा गायकवाड (१९), वैभव ज्ञानोबा गायकवाड (२२), गौरख ऊर्फ अजय पूनमचंद आडे (२८), विठ्ठल लहानप्‍पा पारटकर (३७), भीमराज नारायण काटे (४१, सर्व रा. भारतनगर, गारखेडा परिसर) आणि विजय ऊर्फ छोटू शिवाजी वैद्य (१९, रा. गजानन कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.

त्यांनी केलेल्या हल्ल्यात भालचंद्र काशीनाथ मुळे (४५, रा. भारतनगर) हे मृत झाले होते. त्यांच्या पत्नी लता मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, एप्रिल २०१५ मध्ये औरंगाबाद मनपा निवडणूक झाली. भारतनगर वॉर्ड ९४ मधून काँग्रेसतर्फे नारायण पारटकर उभा होता, तर शिवसेनेतर्फे आत्माराम पवार, राष्ट्रवादीकडून प्रेमसिंग चव्हाण उभे होते. या वेळी भालचंद्र मुळे यांनी चव्हाण यांचा प्रचार केला. यात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. मात्र मुळे याने राष्ट्रवादीचा प्रचार केल्यामुळेच आपण पराभूत झालो, असा पारटकर यास राग होता. २५ जून २०१५ रोजी सायंकाळी मुळे हे उत्तम तांबे यांच्याकडे काही पैशाच्या व्यवहारासाठी जाऊन आले होते.

त्याच वेळी पारटकरसह वरील नऊ आरोपी मुळेच्या घरासमोर गेले. ‘तू तांबेकडे पैसे मागण्यास का गेला होता?’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच प्रचाराचे कारण काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात मुळे जखमी झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात नेले. डॉक्टरंनी उपचार करून दुसऱ्या दिवशी बोलावले. मात्र पहाटेच मुळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल होता. सहायक लोकाभियोक्ता बी.आर. लोया यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यातील चार साक्षीदार फितूर झाले. साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने नऊ आरोपींना शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार शेख शफिक यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...