आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदपत्रांची तपासणी हाेणार:म्हाडाच्या परीक्षेत औरंगाबाद-जालन्याचे डमी रॅकेट सक्रिय; परीक्षेत गैरप्रकार झाल्याची पोलिसांकडे तक्रार

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हाडाच्या विविध ५६५ पदांकरिता राज्यभरात ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान परीक्षा आयाेजित केली हाेती. मात्र, या परीक्षेत औरंगाबाद-जालन्याचे डमी रॅकेट सक्रिय झाल्याने परीक्षेत गैरप्रकार घडला असून पात्र विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा घेऊन त्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करावा, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली आहे. म्हाडा परीक्षेत गैरव्यवहार झाल्याबाबतचे पुरावे त्यांनी पुणे सायबर पाेलिसांना सादर करत सखाेल चाैकशीची मागणी केली आहे.

एमपीएससी समन्वय समितीतर्फे परीक्षेपूर्वीच म्हाडाचे अध्यक्ष आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना परीक्षेतील गैरप्रकाराबाबत माहिती देऊन आवश्यक उपाययाेजना करण्यास सांगितले हाेते. परीक्षा आयाेजन करणारी यापूर्वीची कंपनी जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीचा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर या परीक्षेचे कंत्राट टीसीएस कंपनीला दिले हाेते. मात्र, टीसीएसनेही आवश्यक काळजी घेतली नसल्याचा आराेप विद्यार्थ्यांनी केला आहे. राज्यात हायटेक डिव्हाइसचा वापर करून डमी विद्यार्थी परीक्षेला बसवले जातात. ऑनलाइन पेपर कॅमेऱ्याच्या मदतीने बाहेर पाठवून ताे साेडवला जाताे व डमी उमेदवाराला ब्ल्यूटूथद्वारे बाहेरून उत्तरे पाठवली जातात. प्रामुख्याने अशा प्रकारचे गुन्हे करणारी हायटेक टाेळी औरंगाबाद-जालना परिसरात सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. बीडमधील दिशा काॅम्प्युटर सेंटरवर अर्जुन बिघाेट या डमी उमेदवाराला राहुल सानप या उमेदवाराच्या जागी परीक्षा देताना पाेलिसांनी पकडले. तसेच पवईतील ओरम आयटी पार्क या परीक्षा केंद्रावर औरंगाबाद येथील डमी उमेदवार गणेश सताबन याला चेतन बेलदारच्या जागी परीक्षा देताना हायटेक डिव्हाइससाेबत अटक करण्यात आली होती.

खासगी संस्थांत गैरकारभार : एमपीएससी समन्वय समितीचे नीलेश गायकवाड यांनी सांगितले की, टीसीएस कंपनीला परीक्षेचे कंत्राट दिल्यानंतर पारदर्शक परीक्षा घेतल्या जातील अशी अपेक्षा हाेती. हायटेक डिव्हाइस रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर मेटल डिटेक्टरने संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात यावी, बायाेमेट्रिक तपासणी करावी, माेबाइल जॅमर लावावेत, अशी मागणी केली. त्यापैकी केवळ बायाेमेट्रिक तपासणी परीक्षेच्या सुरुवातीला करण्यात आली. परंतु गैरप्रकार उघडकीस येऊ लागल्यानंतर परीक्षेच्या शेवटचे तीन दिवस मेटल डिटेक्टरने परीक्षार्थींची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यामुळे सुरुवातीच्या पेपरमध्ये डमी रॅकेट सक्रिय राहिले. आता सर्व पदांची १:१० चे गुणाेत्तर पद्धतीने मुख्य परीक्षा घ्यावी किंवा निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी.

राज्यात दहा डमी परीक्षार्थी जेरबंद : पाेलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी राज्यात मुंबई, बीड, लातूर, अमरावती, नाशिक, सातारा येथील डमी विद्यार्थ्यांचे दहा प्रकार उघडकीस येऊन आराेपींना अटक करण्यात आली आहे.

कागदपत्रांची तपासणी हाेणार
म्हाडाच्या परीक्षेत ताेतया उमेदवार बसल्याचे उघडकीस आल्यानंतर गैरमार्गाच्या घटना विचारात घेता म्हाडाने सात ते नऊ फेब्रुवारीच्या परीक्षेदरम्यान सर्व उमेदवारांची हँडहेल्ड मेटल डिव्हाइसद्वारे झडती घेतली. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना कागदपत्रे तपासणीकरिता बाेलावल्यानंतर तसेच निवड झाल्यास रुजू हाेताना त्यांनी परीक्षेचा अर्ज भरताना सादर केलेला फाेटाे, परीक्षेला आल्यानंतर परीक्षा केंद्रावर त्यांचा घेतलेला फाेटाे यांची खातरजमा करण्यात येईल. तसेच परीक्षा देताना त्यांचे करण्यात आलेले सीसीटीव्ही चित्रीकरणदेखील तपासण्यात येणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...