आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य विभागातील कर्मचारी भरती घोटाळ्यापाठोपाठ आता ‘म्हाडा’च्या कर्मचारी भरती परीक्षेच्या पेपरफुटीचे रॅकेटही उघड झाले आहे. दहा दिवसांत समोर आलेल्या या दोन्ही राज्यस्तरीय घोटाळ्यांची पाळेमुळे थेट औरंगाबाद, बीड, जालना या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांशी जोडलेली आहेत. यात प्रामुख्याने औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय नंदू चव्हाण व सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे सूत्रधार आहेत.
हे प्राध्यापक त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. त्यासाेबतच बीड बायपासवरील नवस्वराज्य पोलिस आणि सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचा संदीप भुतेकर आरोग्य भरती घोटाळ्यात आरोपी असून सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. सहा दिवसांमध्ये शहरातील चार प्राध्यापक या नाेकरभरती रॅकेटमध्ये अडकल्याने औरंगाबादच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. शहरात गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षा क्लासेसची वाढती संख्या व या स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी क्लासेसचालक परीक्षेआधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचे समोर आले.
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाचा पेपर त्याच विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी फोडल्याचे उघड केले. या रॅकेटमध्ये सहभागी क्लार्क, डॉक्टर, लिपिक हे काेचिंग क्लासेस चालकांशी संपर्क साधून त्यांच्या विद्यार्थ्यांना पाच ते सहा लाख रुपयांमध्ये पेपर विकत हाेते. परंतु यात सर्वाधिक क्लासेस चालक औरंगाबाद, जालना, बुलडाणा येथील असल्याचे वास्तव रविवारी समोर आले. ‘म्हाडा’ची परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले हाेते, त्याच कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख हा पेपरफुटीमागील सूत्रधार निघाला. देशमुखकडे चाैकशी केल्यानंतर औरंगाबाद शहरातील दोन क्लासेसच्या तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आले.
लष्करातून निवृत्तीनंतर साताऱ्यात उघडले सैनिक भरती प्रशिक्षण
आरोग्य विभागाच्या पेपरफुटी घाेटाळ्यात परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर मिळवलेल्यांत प्रामुख्याने औरंगाबादच्या सातारा परिसरातील संदीप शामराव भुतेकर असल्याचे समोर आले. त्याला अटक करण्यात आली. भुतेकर २०१९ मध्ये लष्करातून निवृत्त झाला. त्यानंतर त्याने साताऱ्यात नवस्वराज्य पोलिस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू केली. शहरात अशा अनेक अकॅडमी आहेत. परंतु त्यात आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले हे दाखवण्यासाठी व अल्पावधीत लाखो रुपये मिळत असल्याने भुतेकर यांनी आरोग्य विभागात लिंक लावून पेपर आधीच मिळवला. ज्या विद्यार्थ्यांनी ६ लाख रुपये दिले त्यांना त्याने हा पेपर पाेहाेचवला. एकूण २३ विद्यार्थ्यांना एकाच वेळी बाेलावून परीक्षेतील प्रश्न वाचवून दाखवले व उत्तरेदेखील पाठ करवून घेतली. मात्र, हॉर्डकॉपी कुणाला दिली नाही. प्रत्येक विद्यार्थ्यामागे त्याला जवळपास ६० ते ७० हजार रुपये मिळत होते.
हरकळकडून विकत घ्यायचे पेपर
म्हाडाच्या पेपरफुटी प्रकरणात पाेलिसांनी औरंगाबादच्या ‘द टार्गेट करिअर पाॅइंट’चा अजय नंदू चव्हाण व सक्षम अकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे यांना मुख्य आरोपी केले आहे. ते आरोग्य विभागाच्या घोटाळ्यातही आरोपी आहेत. चिकलठाण्यातील मिलेनियम पार्कमध्ये राहणारा संतोष लक्ष्मण हरकळ व त्याचा भाऊ अंकुश रामभाऊ हरकळ यांच्या मदतीने या संचालकांनी पेपर विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय आहे. यात रविवारी पोलिसांनी हरकळला अटक केली.
अनेक घाेटाळ्यांत सहभागाचा संशय
शहरातून अटक झालेल्या चार क्लासेस चालकांनी यापूर्वी विविध विभागांच्या परीक्षेतसुद्धा गैरव्यवहार करून नियोजित प्रश्नपत्रिका प्राप्त करून अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याची दाट शक्यता पुणे पोलिसांनी न्यायालयासमोर व्यक्त केली. त्या अनुषंगाने पोलिस आता तपास करत असून औरंगाबादमध्ये आणखी असलेली पाळेमुळे तपासण्यासाठी पथक येण्याची शक्यता आहे.
अजय चव्हाण गणिताचा अभ्यासक, पुस्तक प्रकाशित
आराेपी अजय चव्हाण हा मागील दहा वर्षांपासून शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करतो. मूळ लोणारचा असलेल्या चव्हाणने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून गणित, फिजिक्स विषयात शिक्षण घेतले. सुरुवातीला खासगी क्लासेसवर प्राध्यापक म्हणून काम करत हाेता. नंतर त्याने टीव्ही सेंटर परिसरात ‘द टार्गेट करिअर पाॅइंट’ काेचिंग क्लास सुरू केला. आगामी १३ हजार पोलिस भरतीच्या पदांसाठी त्याने एक डिसेंबरपासून स्पेशल बॅचदेखील नियोजित केली होती.
- गणित व बुद्धिमत्ता या विषयात अजय चव्हाण तज्ज्ञ आहे. २०१९ मध्ये त्याने स्पर्धा परीक्षेच्या बदललेल्या पॅटर्नवर आधारित ‘मास्टर ऑफ मॅथ्स’ हे पुस्तकदेखील प्रकाशित केले. पैठण गेट परिसरातील सक्षम एमपीएससी-यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा अंकित चनखोरे व कृष्णा जाधवसोबत भागीदारीत क्लासेसही सुरू केले. यात शहरातील क्लासेस चालकांच्या माहितीनुसार, कृष्णा नोकरीत असल्याने चनखोरेला त्याने सक्षम क्लासचा संचालक बनवले हाेते.
- मागील चार वर्षांमध्ये अजय चव्हाण त्याच्या क्लासेसच्या यशामुळे अचानक टीव्ही सेंटर भागात चर्चेत आला हाेता.
क्लासेसचे वाढते जाळे अन् स्पर्धेमुळे भ्रष्टाचाराचा मार्ग
तज्ज्ञांच्या मते, शहरात टीव्ही सेंटर, पैठण गेट भागात ‘कोटा’प्रमाणे क्लासेसचे जाळे निर्माण झाले आहे. प्रत्येक इमारतीमध्ये अभ्यासिका, क्लासेस, मार्गदर्शन केंद्रेच दिसतात. परिणामी, त्यांच्यात स्पर्धा वाढली व निकाल दाखवण्याच्या ईर्षेने प्राध्यापक थेट घोटाळ्यात सहभागी होऊन पेपर खरेदीपर्यंत मजल मारत आहेत. विश्वासू विद्यार्थ्यांनाच हे प्राध्यापक पेपर विक्रीसाठी विचारणा करतात. यातून लाखाेंची कमाई हाेते.
लहान भावाच्या नावे परीक्षेला बसणारा माेठा भाऊ अटकेत
औरंगाबाद | एसआरपीएफच्या भरती परीक्षेत औरंगाबादच्या केंद्रावर लहान भावाच्या जागी चक्क मोठा भाऊच परीक्षा देत असल्याचे रविवारी उघड झाले. हॉलतिकीट तपासणीदरम्यान संशय आल्याने पाेलिसांनी त्याला अटक केली. सुजित धनराज राजपूत (२५, रा. अनामतपूरवाडी, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.
शेतकरी कुटुंबातील सुमीतने (२१) राज्य राखीव दलाच्या परीक्षेसाठी अर्ज केला हाेता. पण रविवारी परीक्षेच्या दिवशी सुमीतऐवजी त्याचा सख्खा मोठा भाऊ सुजितनेच परीक्षा देण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे व हॉलतिकीट तयार केले हाेते. साताऱ्यातील शंभुराजे महाविद्यालयातील केंद्रावर तो परीक्षेसाठी बसल्यानंतर पोलिसांना संशय आला. साताऱ्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना कर्मचाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर माळाळे यांनी तपासणीचे आदेश दिले. त्यात त्याने सर्व शैक्षणिक कागदपत्रे बनावट तयार करून त्यावर स्वत:चे छायाचित्र व मूळ हॉलतिकिटाप्रमाणेच दुसरे हॉलतिकीट बनवल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्याने पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण सोडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.