आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक्ड द चेन:राज्याचे उद्योगचक्र गतिमान; निर्बंधांतही यंदा राज्यातील 90 टक्के उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू

औरंगाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन ते लॉकडाऊन : लसीकरण, पूरक सरकारी धोरणाने चेन ब्रेक

यंदा राज्यातील ९० टक्के उद्योग पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. तुरळक अपवाद वगळता परप्रांतीय कामगारांना राज्यातच थांबवण्यात सरकार आणि उद्योगांना यश आले आहे. एमआयडीसीत कोरोना चाचण्या आणि लसीकरण केंद्र उभारल्याने कामगारांमध्ये सुरक्षिततेबाबत विश्वास निर्माण होऊन कंपन्यांमधील उपस्थिती वाढली आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य सरकारने १३ एप्रिल राेजी उद्योग विश्वासाठी दिशानिर्देश जारी केले.

यात कंपनी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचे १०० टक्के लसीकरण होईपर्यंत कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले. दर १५ दिवसांनी या चाचण्या करणे आवश्यक आहे. २२ एप्रिलपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली. तो आता १५ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनमध्येही उद्योगचक्र अबाधित असल्याचे उद्योजकांची संघटना लघुउद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवी वैद्य यांनी सांगितले.

६२ प्रमुख एमआयडीसीत कोरोना चाचण्या केंद्र; २५४ लसीकरण केंद्रांमुळे दिलासा
कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्यांसाठी ६२ प्रमुख एमआयडीसीमध्ये ९३ टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यात १४ लाख कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांची क्षमता आहे. पात्र कर्मचाऱ्यांसाठी २५४ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. या दोन्ही प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संसर्गाची भीती दूर होऊन कंपन्यांमध्ये उपस्थिती वाढल्याचे रवी वैद्य म्हणाले.

मे २०२० : मजुरांचे स्थलांतर
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवांशी संबंधित उद्योगांना परवानगी होती. २५ एप्रिलपासून अन्य उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले. ६ मे २०२० रोजी राज्यात १५,५२७ उद्योगांमध्ये ९,६०,७६३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. प्रत्यक्षात २,२७,७१३ कर्मचारी कामावर आले. परप्रांतीय मजूर गावी परतल्याने अनेक उद्योग बंद होते.

मे २०२१ : स्थलांतर रोखले
या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. सुरू उद्योग आणि कामगार दोघांत वाढ झाली आहे. तीन श्रेणीतील उद्योगांना परवानगीने ९० टक्क्यांहून अधिक कंपन्या सुरू आहेत. परप्रांतीय कामगारांचा प्रश्न नाही. कोरोना चाचण्या आणि लसीकरणवर भर आहे. यामुळे यंदा ७ मे २०२१ रोजी राज्यातील २३,५२५ उद्योगात १४,२६,२६६ कामगारांची आवश्यकता असून प्रत्यक्षात ११,४१,०१३ कर्मचारी कामावर आहेत, तर २,८५,२५३ कामगारांची कमतरता आहे.

11.4 लाख कर्मचारी, कामगार यंदा कामावर
यंदा राज्य सरकारने औद्योगिक क्षेत्रातील तीन प्रमुख श्रेणीतील उद्योग, प्रकल्पांत काम सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली. उद्योग खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात अत्यावश्यक सेवेतील १० हजार उद्योग सुरू असून यात ४,६८,५२५ मनुष्यबळ कामाला आहे.

  • निर्यातीवर आधारित १४७१ उद्योगांमध्ये २,०४,९२२ कर्मचारी काम करत आहेत.
  • उत्पादन बंद न करता येण्याच्या श्रेणीतील ८९८ युनिट सुरू असून येथे ९८,६७६ जण कामावर आहेत.
  • ११,१५६ उद्योगांनी ३,६८,८९० कर्मचाऱ्यांची त्यांच्या कंपन्यांतच निवासाची सोय केली आहे.
  • एकूण २३,५२५ उद्योगांत सध्या ११,४१,०१३ जण कामावर.
  • नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ८०% जास्त आहे.

यामुळे उद्योग विश्व गतिमान

  • तीन श्रेणीतील उद्योगांना ब्रेक द चेनमध्ये सरकारकडून परवानगी
  • या श्रेणीतच ८० टक्के उद्योग
  • वाहतूक सुरू, मालाची ने-आण शक्य
  • परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर रोखण्यात यश
  • चाचण्या, लसीकरणामुळे सकारात्मक संदेश

लॉकडाऊन ते लॉकडाऊन : लसीकरण, पूरक सरकारी धोरणाने चेन ब्रेक
6 मे 2020 7 मे 2021
15,527 सुरू उद्योग 23525
9,60,763 कामगारांची गरज 14,26,266
2,27,713 उपलब्ध कामगार 11,41,013
7,33,050 कमतरता 2,85,253

बातम्या आणखी आहेत...