आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का, 3.4 रिश्टर स्केलची नोंद

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील वसमत, औढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी (2 जून) सकाळी सात वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. या भूकंपाची 3.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये विशेषतः वसमत तालुका, औंढा नागनाथ तालूका व कळमनुरी तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक जमिनीतून मोठे आवाज होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या आवाजाची या भागातील गावकऱ्यांना सवय झाली आहे. मात्र हे आवाज नेमकी कशामुळे येत आहेत याबाबत स्पष्ट माहिती गावकऱ्यांनाही मिळेनाशी झाली आहे.  जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, प्रवीण फुलारी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, पांडुरंग माचेवाड, ज्योती पवार यांच्या पथकाने काही गावांना भेटी देऊन गावकऱ्यांना सुरक्षिततेबाबत माहिती दिली. त्यामुळे मोठा आवाज झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन देण्यात आले आहे.

दरम्यान आज सकाळी सात वाजता कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव,  निमटोक, टव्हा, सापळी, भुरक्याचिवाडी, पोत्रा यासह परिसरातील गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. तसेच वसमत तालुक्यातील कुरुंदा, वापटी, शिरळी, पांगरा या परिसरात तर औंढा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी या भूकंपाची 3.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी रोहित कंजे यांनी स्पष्ट केले आहे. या भूकंपाच्या सौम्य धक्क्या मुळे ग्रामीण भागात कुठेही हानी झाली नाही. मात्र तहसील कार्यालयाच्या पथकाकडून प्रत्येक गावात पहाणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.

0