आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री व सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. उलट औरंगाबाद शहराचे नामांतर करण्यातच त्यांना रस आहे. या नामांतराला आमचा विरोध आहे. हा निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही रविवारी काळे झेंडे दाखवणार आहोत, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला. तसेच जनमत घेऊन शहराच्या नामांतराचा निर्णय घ्या, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार इम्तियाज म्हणाले, ‘सध्या राज्यात फक्त दोन मंत्र्यांचे सरकार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पण त्यांचे गाऱ्हाणे एेकण्यासाठी राज्याला कृषिमंत्री नाही.
शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी नामांतराचे राजकारण करण्यात मुख्यमंत्री व्यग्र आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करतो. पण या महापुरुषांचे नाव घेऊन राजकीय पोळ्या भाजण्याचा जे लोक प्रयत्न करत आहेत, त्यांनी एक नवीन शहर बनवावे व त्याला महाराजांचे नाव द्यावे किंवा पुण्याला संभाजी महाराजांचे नाव द्यावे. आमचा त्याला विरोध नसेल. पण औरंगाबादचे नाव आम्ही बदलू देणार नाही.’ शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी अफझल खान आला होता तेव्हा त्याच्याकडे खंजीर होता. तसेच बंडखोर आमदारांच्या हातात खंजीर आहेत. ते कुणाच्या पाठीत खुपसतील हे सांगता येत नाही, असा टोलाही इम्तियाज यांनी शिंदेसेनेला लगावला.
अनेक मागण्यांचे निवेदन देणार
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करण्यात यावा, ग्रामीण रस्त्यांसाठी पॅकेज देण्यात यावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे, आमखास मैदानावर स्टेडियम तयार करावे आदी मागण्यांचे निवेदनही इम्तियाज जलील मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.