आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो मिनिस्टर:यांचा रुसवा, त्यांचा फुगवा, रिक्षावाले इम्तियाज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यांचा रुसवा, त्यांचा फुगवा राज्यातील सत्तांतरात बंडखोरीमुळे गाजलेले संजय शिरसाट आणि त्यांचे आता कट्टर विरोधक बनलेले उद्धव सेनेचेे माजी खासदार चंद्रकांत खैरे चर्चेत असतातच. दोघेही जण उत्सवप्रिय. सभा, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणे, तेथे काहीतरी खरमरीत बोलणे, टीकाटिप्पणी करणे दोघांनाही आवडते. त्यामुळे लोक त्यांनी काहीतरी बोलावे, असा प्रयत्न करतात. पण दोन दिवसांपूर्वी गणेश महासंघाच्या कार्यालयात गणेश स्थापनेसाठी आलेले खैरे रोहयोमंत्री संदिपान भुमरेंना पाहून रुसले. कोणाशीही न बोलता निघून गेले. शिरसाट तर कुठे दिसतच नाहीत. ते पाहून एक शिवसैनिक म्हणाले, एकीकडे रुसवा आणि दुसरीकडे फुगवा, अशी स्थिती झाली आहे.

भेटीमागचं ‘राज’ काय ? मुंबईत भाजप नेत्यांनी अचानकच राज ठाकरेंच्या निवासस्थानी चकरा मारायला सुरुवात केलीय. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, नवे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही राज यांच्या घरी जाऊन ‘मोदक’ खाल्ले. त्यामुळे सुस्तावलेल्या मनसैनिकांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे, पण शंकेची पालही त्यांच्या मनात चुकचुकतेय. ‘मातोश्री’च्या विरोधासाठी एकनाथ शिंदेंसारखा मातब्बर नेता गळाला लागलेला असताना भाजपला अचानक राजसाहेबांबद्दल एवढं ‘प्रेम’ का उतू आलंय? असा प्रश्न त्यांना सतावतोय. बरं, आपला नेताही काही बोलत नाही. या भेटीगाठीमागचं ‘राज’ नेमकं काय असावं? हे कोडे दसरा मेळाव्यापर्यंत तरी उलगडावं एवढीच अपेक्षा कार्यकर्त्यांची अाहे.

रिक्षावाले इम्तियाज कोणे एकेकाळी रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनाही रिक्षाचे आकर्षण वाटू लागले. काही दिवसांपूर्वी त्यांनी रिक्षा चालवण्याची हौस भागवून घेतली. आता पुढे काय होते याकडे एमआयएमच्या कार्यकर्त्यांचे आशाळभूत डोळे लागले आहेत.

येणार नाहीत, त्यांचीही नोंदणी कागदावर सक्रिय सदस्य संख्या तीनशेच्या आसपास. पण कोणतेही आंदोलन म्हटले की, पंधरा-वीसच्या वर कार्यकर्ते येतच नाहीत. वारंवार विनंती केली. आंदोलनाच्या दिवशी लक्षात राहावे म्हणून मेसेज पाठवण्यासाठी एकाची नियुक्ती केली. तरीही फरक पडेना. त्यामुळे एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याने खास शक्कल लढवली. त्याने असा मेसेज केला की, उद्याच्या आंदोलनात जे सहभागी होतील त्यांची तर नावे नोंदवली जातीलच, पण जे येणार नाहीत त्यांचीही नावे स्वतंत्रपणे नोंदवू. याचा परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा मंडप खच्चून भरला होता.

कंपाउंडरच करून टाकले आम्ही स्पेशालिस्ट डॉक्टर नाही, जनरल फिजिशियन आहोत, असे म्हणून काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी धमाल उडवून दिली. ही घटना ताजी असतानाच दुसरा प्रसंग घडला. गुलाबरावांनी ५ सरपंचांचा सत्कार केला. तेव्हा एक सरपंच म्हणाले, ‘भाऊ, जि.प.त त्या कारकुनाची बदली करून टाकली सीईओनी. तेवढी रद्द करा ना.’ त्यावर भाऊ चिडून म्हणाले, ‘अरे, मी राज्याचा मंत्री. मला निदान क्लास वनचे तरी काम सांग.’ पण सरपंचांनी हट्ट पूर्ण करून घेतला. त्यावर या सरपंचाने भाऊंचा पार कंपाउंडर करून टाकला, अशी चर्चा सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...