आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाल्मीच्या जागेवर डोळा:प्रबोधिनी स्थलांतराबाबत मंत्री भुमरे म्हणाले, ‘हा निर्णय होऊ देणार नाही’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी पैठणमध्ये १९९५ मध्ये मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीची सुरुवात करण्यात आली. आता ही संस्था औरंगाबादला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ‘वाल्मी’ची १५ एकर जागा मिळवण्याचा घाट घातला जात आहे. तसे आदेशच पारित करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पैठणचे आमदार तथा राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांना मात्र याबाबत काहीच माहिती नाही. असा निर्णय झाला तर त्याला आपला विरोध असेल, अशी भूमिका त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. पैठणची प्रबोधिनी ही मराठवाड्यातली नावाजलेली संस्था म्हणून ओळखली जाते. या संस्थेत विविध विभागातल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम दोन दशकांपासून सुरू आहे. या प्रबोधिनीसाठी मोठ्या प्रमाणात निधीदेखील खर्च करण्यात आला आहे. मात्र पैठणला जाण्यास अधिकारी उदासीन असल्यामुळे आता तेथील सुसज्ज इमारत सोडून ही संस्था औरंगाबादला स्थलांतरित करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेनुसार ही संस्था स्थलांतर करण्यासाठी आणि वाल्मीत पंधरा एकर जागा देण्याबाबत पत्रदेखील दिलेले आहे. दैनिक दिव्य मराठीने सर्वप्रथम या निर्णयाबाबतचे वृत्त प्रकाशित केले हाेते.

भाजप करणार आंदोलन
भाजपचे पैठण तालुकाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की, ‘पैठणची प्रबोधिनी आम्ही औरंगाबादला हलवू देणार नाही. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. पैठणचा विकास होण्याऐवजी ‘भकासीकरण’ करण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही पूर्ण ताकदीने या निर्णयाला विरोध करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनादेखील निवेदन देऊ.’

प्रबोधिनी पैठणमध्येच राहिली पाहिजे : भुमरे
पैठणचे आमदार तथा मंत्री संदिपान भुमरे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘मला याबाबत काहीच माहिती नाही. पैठणचे लोकप्रतिनिधी या नात्याने माझा ही संस्था औरंगाबादला हलवण्यास विरोध असेल. ही प्रबोधिनी पैठणमध्येच राहिली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’ प्रशासकीय पातळीवर इतका महत्त्वाचा निर्णय घेतला जात असताना यशदाच्या महासंचालकांनी पैठणमध्ये येऊन पाहणीदेखील केली असताना स्थानिक लाेकप्रतिनिधी व राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले भुमरे याबाबत अनभिज्ञ कसे? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...