आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधीवरून वाद:मंत्री देशमुख, टोपेंना निधी कसा मिळतो? कमी निधीमुळे आ. अतुल सावे भडकले; सत्ता आमची म्हणून आम्हालाच जास्तीचा निधी : आमदार अंबादास दानवे

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेच्या निधीत शिवसेना आमदारांना झुकते माप देण्यात आले तर भाजपच्या आमदारांना फारच कमी निधी देण्यात आल्याचा आरोप झाला. या कारणावरून भाजपच्या आमदारांनी बैठकीतून वॉकआऊट केल्याचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले. दरम्यान, मागच्या सरकारमध्ये भाजपनेही असेच केले होते, असा पलटवार शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला. या योजनेत शहरासाठी १९ कोटी आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (काँग्रेस), आरोग्यमंत्री राजेश टोपे (राष्ट्रवादी), आमदार मनीषा कायंदे (शिवसेना) या जिल्ह्याबाहेरील लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार काही निधी मंजूर केला. त्यालाही आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आक्षेप घेतला. शिवसेना आमदार संजय शिरसाट, अंबादास दानवे यांना प्रत्येकी ३ कोटी, तर भाजपचे आमदार सावे, हरिभाऊ बागडे यांना ५० लाखच निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या शिफारशीनंतर ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सत्ता आमची, जास्त निधी मिळवणारच : आमदार दानवे आमदार अंबादास दानवे म्हणाले की, जिल्ह्याबाहेरील लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवरून काही निधी मंजूर झाला असला तरी त्याचा खर्च जिल्ह्यातच होणार आहे. तो इतर जिल्ह्यांत जाणार नाही. राज्यात शिवसेनेसह महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे आम्हाला निधी जास्त मंजूर झाला आहे. भाजपनेही त्यांच्या काळात जास्तीचा निधी मंजूर केला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे म्हणाले की, काँग्रेसचे जिल्ह्यात आमदार नाहीत. त्यामुळे आमच्या मंत्र्यांनी कामाची शिफारस केली, त्यानुसार निधी मंजूर झाला. तसे पालकमंत्र्यांनीदेखील नियोजन समितीच्या बैठकीत सावेंना सांगितले आहे, असे काळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...