आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेची पिटलाइन आता आैरंगाबादेत होणार नसल्याचे स्पष्टच झाले आहे. २००८ पासून आैरंगाबादकर या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत होेते. केंद्रात वर्णी लागल्यानंतर अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनीही वजन वापरून पिटलाइनसाठी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे भाजप नेते, उद्याेजकांच्या शिष्टमंडळासह पाठपुरावा केला. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून विद्यमान रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी ‘चिकलठाण्यात पिटलाइन मंंजूर आहे’ असे लेखी उत्तर संसदेत दिले. मात्र या सगळ्यांवर कुरघाेडी करत जालन्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रिपदी वर्णी लागताच आपल्या मतदारसंघात पिटलाइन पळवली. त्यावर सारवासारव करताना डॉ. कराड ‘जालना व आैरंगाबाद या दाेन्ही ठिकाणी पिटलाइन होईल’ असे सांगत राहिले. प्रत्यक्षात यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण ‘आरटीआय’मध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे बाेर्डाने ‘चिकलठाण्यात पिटलाइनसाठी पुरेशी जागा नाही’ असे उत्तर देत उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले आहे.
यापूर्वी दमरेच्या नांदेडचे तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांनी दोन वेळा चिकलठाणा पिटलाइनसाठी प्रस्ताव पाठवला होता. सिकंदराबाद झोनचे महाव्यवस्थापक विनोद यादव यांनीही यास दुजोरा दिला होता. तरीही चिकलठाण्यात पुरेशी जागा नसल्याचे इतक्या उशिरा रेल्वे बाेर्डाला कसे लक्षात आले? की प्रस्ताव पाठवताना दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या जागेची माहिती घेतली नव्हती का? असे प्रश्न उपस्थित होेत आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चिकलठाणा येथे जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी रेल्वे प्रशासनाने एकदाही औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली नाही. एकूणच रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी जालन्याला झुकते माप देत घेतलेल्या निर्णयाला पाठीशी घालण्यासाठीच व आैरंगाबादचा प्रस्ताव टाळण्यासाठी रेल्वे बाेर्डाकडून वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. दुसरीकडे, आैरंगाबादेत भाजपकडे प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे ज्येष्ठ नेते असलेले दानवे पिटलाइनसाठी जालन्याचे घाेडे दामटू शकले. त्यांच्या निर्णयाला पक्षातूनही कुणी विरोेधी करू शकले नाहीत, असा निष्कर्षही राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.
दानवेंच्या ‘ज्येष्ठत्वा’मुळे डॉ. भागवत कराडांची माघार
भाजप नेते डॉ. भागवत कराड यांची आधी राज्यसभेवर व नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर आैरंगाबादकरांच्या विकासाबाबत आशा पल्लवित झाल्या. खासदार होताच डॉ. कराड यांनी पिटलाइनसह विविध रेल्वे प्रकल्पांचा पाठपुरावा सुरू केला. औरंगाबाद-नगर मार्गाचे सर्वेक्षण करून घेतले. रोटेगाव कोपरगावसह दौलताबाद-चाळीसगाव, आैरंगाबाद- जळगाव मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण डॉ. कराड यांना मंत्रिमंडळात संधी मिळताना दानवे यांच्याकडे खांदेपालटात रेल्वे राज्यमंत्रिपद आले. त्यानंतर मात्र पक्षातील ‘ज्येष्ठत्वा’चा मान राखत डॉ. कराड यांना रेल्वेच्या अनेक मुद्द्यावरून दानवेंसमाेर माघार घ्यावी लागली. त्यामुळेच आैरंगाबादला पिटलाइन गमवावी लागली.
जालन्यासाठी काढली ११६ कोटींची निविदा
परभणीच्या राज्यसभा खासदार फाैजिया खान यांनी आैरंगाबादच्या पिटलाइनबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना विद्यमान रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी ‘चिकलठाण्यात पिटलाइन मंजूर आहे’ असे लेखी उत्तर दिले होते. पण कॅबिनेट मंत्र्यांचे उत्तरही खाेटे ठरवून रावसाहेब दानवेंनी जालन्यात हा प्रकल्प पळवला. ११६ कोटींची निविदा मंजूर करून कामाला सुरुवात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.