आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस मंत्री परब जबाबदार : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सव्वा महिन्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. या काळात आतापर्यंत एसटीच्या सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यास परिवहनमंत्री अनिल परब जबाबदार अाहेत, असा अाराेप करत त्यांच्यावर पोलिस महासंचालक, सीबीआय प्रमुखांनी कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडणारे अ‍ॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी मंगळवारी औरंगाबादेत केली. दरम्यान, एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे, हा लढा आम्ही जिंकणारच, असा दावादेखील त्यांनी केला.

खासदार शरद पवार यांच्यामुळे विलीनीकरणास विलंब होत असल्याचा आरोपही त्यांनी केला अाहे. या वेळी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत अ‍ॅड. जयश्री पाटील यांची उपस्थिती होती.

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात मंत्री आव्हाडांची चौकशी करा : म्हाडा पेपरफुटी प्रकरण औरंगाबादचे आहे, परंतु त्याचा तपास पुण्याला हाेत अाहे. परीक्षेसाठी एजंटने पैसे घेतल्याचे सांगितले. गृहनिर्माणमंत्री अाव्हाडांना कुणी पैसे मागितले हे माहिती अाहे, त्यामुळे त्यांची चौकशी करा, आव्हाड स्वतः दोषी आहेत. त्यांचे नाव आरोपींच्या यादीत टाका, नाही तर पुरावे नष्ट होतील. याप्रकरणी महासंचालकांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे अॅड. सदावर्ते यांनी सांगितले.

घोषणांनी दणाणले बसस्थानक : अ‍ॅड. सदावर्ते यांनी मंगळवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानकात भेट देऊन संपकऱ्यांना मार्गदर्शन केले. जय श्रीराम, एक मराठा लाख मराठा, डंके की चोट पर विलीनीकरण झालेच पाहिजे, जयभीम, हम हैं हिंदुस्थानी, वंदे मातरम अादी घोषणा सदावर्ते यांनी दिल्या. या वेळी कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसर घाेषणांनी दणाणून साेडला हाेता.

आजपासून बडतर्फीची कारवाई सुरू : परिवहनमंत्री परब यांनी १३ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर परतण्याचे आवाहन केले होते. परंतु, कर्तव्यावर न जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. सोमवारी रात्री त्याची मर्यादा संपली आहे. त्यामुळे आता १५ डिसेंंबरपासून कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीची कारवाई सुरू होणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर म्हणा
राजकीय नेत्यांसह सर्वांनी संभाजीनगर नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर असा अाैरंगाबाद शहराचा उल्लेख करावा. मुख्यमंत्री व इतर नेत्यांनी संभाजीनगर हा उल्लेख एकेरी न करता छत्रपती संभाजीनगर असे म्हणावे, असे अॅड. सदावर्ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...