आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Misuse Of GR For Retirement Service Over One Hundred And Fifty Elderly; Mockery Of The Educated Unemployed; Widespread Misuse Of University Coffers To Maintain Relationships News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक!:निवृत्तांच्या सेवेसाठी जीआरचा दुरुपयोग दीडशे वृद्धांवर मेहेरनजर; सुशिक्षित बेरोजगारांची चेष्टा; नातेसंबंध जपण्यासाठी विद्यापीठाच्या तिजोरीचा सर्रास गैरवापर

अमरावती25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • का म्हणून संत गाडगेबाबांच्या नावाला बदनाम करता?

स्वत:चे नातेसंबंध जपण्यासाठी विद्यापीठाच्या तिजोरीचा खुलेआम गैरवापर सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. वेगवेगळ्या खात्यातील दीडशेवर निवृत्तांना विद्यापीठाने कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू करुन घेतले असून, त्यांच्या मानधनामुळे विद्यापीठ खजिन्याला आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा फटका बसला अाहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेल्या या गैरप्रकारासाठी शासकीय जीआरचा सोयीचा अर्थ लावण्यात आला. त्याचवेळी त्यातील काही तरतुदींना केराची टोपली दाखवण्यात आली. शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची (कर्मचाऱ्यांची नव्हे) सेवा करार पद्धतीने विवक्षित (विशिष्ट) कामांसाठी घेण्याची सन २०१६ च्या शासन निर्णयात तरतूद आहे. परंतु विद्यापीठाने गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचीच निवड केली आहे. िवद्यापीठाच्या विविध विभागात नेमण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांची संख्या दीडशेच्या आसपास असून ते थेट नियमित कर्मचाऱ्यांच्या अविर्भावात वागत आहेत. शासन निर्णयानुसार सदर अधिकाऱ्यांना एकेका वर्षापुरता आदेश देत केवळ तीनच वर्षांपर्यंत काम देता येते. परंतु निवड झालेल्यांपैकी बहुतेकांच्या नेमणुकीला पाचपेक्षा अधिक वर्षे लोटली आहेत.

संत गाडगेबाबांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठाचा हा प्रकार अत्यंत संतापजनक असून, आर्थिकदृष्ट्या संपन्न सेवानिवृत्तांचे खिसे भरण्यापेक्षा गरजू बेरोजगारांची विद्यापीठात भरती करावी, अशी मागणी पुढे आली आहे. सदर नेमणूक करताना प्रारंभी जाहिरात प्रकाशित करावी लागते. विवक्षित कामासाठी सेवानिवृत्तांकडून अर्ज मागवणे, नामिका सूची (पॅनल) तयार करणे, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे, बंधपत्र/हमीपत्र भरुन घेणे, एक वर्षाची नियुक्ती देणे, नियुक्ती आदेशावर कामाचे स्वरुप व कालावधी याचा स्पष्ट उल्लेख करणे अशी नेमणुकीची कायदेशीर चौकट आहे. विशेष असे की एकूण मंजूर पदांच्या दहा टक्के अधिकाऱ्यांनाच नियुक्ती देणे आणि ६५ वर्षांपर्यंतच अशा कर्मचाऱ्यांना कार्यरत ठेवणे या बाबीही शासनादेश नमूद आहेत. विवक्षित कामाचा तीन वर्षांचा अनुभवदेखील गरजेचा असून कोणतीही विभागीय चौकशी सुरु असणे किंवा प्रस्तावित असणे चालणार नाही, असेही जीआरमध्ये नमूद आहे.परंतु नेमणुकीचा आदेश देताना यापैकी बहुतेक मुद्द्यांना बगल देण्यात आली आहे.

जीआरचा सोयीचा अर्थ काढून नातेसंबंधातील सेवानिवृत्तांना िवद्यापीठात ‘सेवानिवृत्त कर्मचारी’ म्हणून रोजंदारीवर रुजू करुन घेतले. यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांतून निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांचा ही समावेश आहे. अगदी सेवानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी हे कर्मचारी पुन्हा कामावर हजर झालेत. विद्यापीठाशिवाय पोलिस, महसूल, महानगरपालिका, पाणी पुरवठा, बांधकाम विभाग आदी विभागातील सेवानिवृत्तांसाठी विद्यापीठ म्हणजे ‘आयते कुरण’ ठरले आहे. विवक्षित कामासाठीच सेवा घ्यावी, असे शासन निर्णयात नमूद असताना त्यातील एकाही कामासाठी सेवा घेतली जात नाही, असा अनुभव आहे. उलट निवृत्त कर्मचारीच खुशाल नियमित कर्मचाऱ्यांचा टेबल सांभाळतात आणि खुर्चीवर बसून फाइलवर नोटींगही करतात, असे निदर्शनास आले आहे.

काय आहे ‘जीआर’चे म्हणणे ?
१७ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तांची नियुक्ती करताना जाहिरात देऊन प्राप्त अर्जांची नामिका सूची (पॅनल) तयार करणे बंधनकारक आहे. सदर नियुक्त्या केवळ आस्थापना विषयक बाबी, सेवा प्रवेश नियम, पायाभूत सुविधांची निर्मिती, नागरी सेवा पुरविणे, विशेष गुप्त वार्ता, योजनांचे मूल्यमापन इत्यादी करिता करता येतात. निवडप्रक्रिया आणि नियुक्तीचे नियमदेखील शासनिर्णयात स्पष्टपणे नमूद आहेत. परंतु त्या सर्वच मुद्यांना विद्यापीठाने बगल दिली.

सर्वांच्या सेवा आता नियंत्रित करू
या निवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केले, तेव्हा शासनादेश निघायचा होता. विद्यापीठाच्या तत्कालीन विधी-उपविधीनुसार या नेमणुका केल्या गेल्या. दरम्यान २०१६ च्या शासनादेशानुसार विद्यापीठाने आपले विधी-उपविधी तयार केले आहेत. ते अलिकडे पूर्ण झाले असून आता त्यानुसार सर्वांच्या सेवा नियंत्रित केल्या जातील. शिवाय बेरोजगारांना कामे देण्याबाबतही कौशल्य विभागाच्या उपसंचालकांकडून यादी मागवण्यात आली आहे. - तुषार देशमुख, कुलसचिव, अमरावती विद्यापीठ.
दीडशेवर निवृत्तांना कंत्राटी कर्मचारी म्हणून करून घेतले रुजू

का म्हणून संत गाडगेबाबांच्या नावाला बदनाम करता?
संत गाडगेबाबांनी आपले अख्खे जीनव रंजल्या-गांजल्यांसाठी वेचले. त्यांनी गरजूंना मदत केली. परंतु त्यांच्याच नावाने विद्यापीठ चालविणाऱ्या निवडक आपमतलबी अधिकाऱ्यांनी गरजूंना बाजूला सारुन सधन पेन्शनर्सला िवद्यापीठ निधीवर पोसण्याचा उद्योग सुरु केला आहे. त्यांची ही कृती पाहून एका अधिकाऱ्याने का म्हणून गाडगेबाबांना बदनाम करता, असा संतप्त सवाल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...