आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयटी हेरिटेज मॅरेथॉन:आरती झंवर, रामेश्वर मुंजाळ ठरले मॅरेथॉन चॅम्पियन, रनउत्सवात एक हजार धावपटू धावले

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दौलताबादच्य निसर्गरम्य घाटात पहाटे बाेचऱ्या थंडीत एक हजार पेक्षा अधिक धावपटू धावले. औरंगाबाद ब्लॅक बक्स यांच्यातर्फे आयोजित तिसऱ्या एमआयटी हेरिटेज हाफ मॅरेथॉन स्पर्धेत 25 किमी गटात महिलांमध्ये आरती झंवर आणि पुरुष गटात रामेश्वर मुंजाळने विजेतेपद पटकावले.

जगप्रसिद्ध असलेला दौलताबाद-वेरूळ परिसर गर्दीने फुलून गेला होता. दौलताबादच्या घाटातील दरवाज्याजवळून 10 किमी, 21 किमी व 25 किमी अशी तीन गटातील ही मॅरेथॉन सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे, स्पेशल आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना, एमआयटीचे अध्यक्ष यज्ञवीर कवडे, संजीव ऑटोचे संजीव तांबोळकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. रेस डायरेक्टर म्हणून ज्येष्ठ मॅरेथॉनपटू व्यंकट यांनी काम पहिले. मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण दोन लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

वॉर्मअप, ढोलचा गजर, पाणी, फळांची सुविधा

धावपटूंकडून प्रथम वॉर्मअप करवून घेण्यात आला. मार्गावर अनेक ठिकाणी ढोलताशांच्या निनादात धावपटूंचे स्वागत करण्यात आले. इलेक्ट्रिक दुचाकीवर पायलट तैनात होते. मार्गावर जागोजागी मार्गदर्शक फलक, पायलट गाड्या, पाणी, बिस्कीट, गोळ्या, चॉकलेट, संत्री, सहा वॉटर स्टेशन होते. त्या प्रत्येक ठिकाणी डॉक्टर आणि कार्यकर्ते हजर होते. विविध ठिकाणी चार सुसज्ज कार्डियाक अँब्युलन्सही होत्या. दौड संपवून आलेल्या धावपटूंसाठी कुलिंग डाऊनसाठी परिसर बनवला होता. स्पर्धकांसाठी पौष्टिक ब्रेकफास्ट ठेवला होता.

अत्याधुनिक तंत्रज्ञानचा वापर

स्पर्धेत वेळ मोजण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. प्रत्येक धावपटूला देण्यात आलेल्या क्रमांकांची नोंद संगणकावर होती. स्पर्धा सुरु झाल्याबरोबर सर्वांच्या वेळांची नोंद झाली आणि स्पर्धा संपताच त्यांनी किती मिनिटांत स्पर्धा पूर्ण केली त्याचा एसएमएस स्पर्धकांना आला. तो दाखवून धावपटूंना आपले नाव आणि वेळ लेसरद्वारे मेडलवर नोंदवून दिली जात होती.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे

25 किमी महिला - आरती झंवर (प्रथम), गुंजन पाटील (द्वितीय), आंचल मुंदडा (तृतीय). पुरुष - रामेश्वर मुंजाळ, जितेंदरसिंग शेखावत, कुंदनकुमार सिंग (तृतीय). 21 किमी (18 ते 44 वर्षे) महिला - अश्विनी काटोळे, अक्षिता मुसांडे, कविता इमाळे. पुरूष - प्रदीप राजपूत, विक्रम बोरुडे,, रोहित कुमार. 45 ते 90 वर्षे महिला - प्रीती डिग्गीकर, हर्षा कुंकूलोळ, शिल्पा जोशी. पुरूष - लालचंद सूर्यवंशी, गणेश घुगे, नितीन चौधरी. 10 किमी 16 ते 44 वर्षे पुरुष - भवानी सिंग, सिद्धेश्वर आल्हाट, संजय धनवे. महिला - विशाखा बासकर, प्रियांका ओकसा, सुहानी के. 45 ते 90 वर्षे पुरुष - राम लिंभारे, भरत वाघ, भगवान कच्छवे. महिला - शिल्पा कुलकर्णी, विठाबाई कच्छवे, आभा सिंग.

बातम्या आणखी आहेत...