आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद पेटणार:शिक्षक गावात राहून शिकवणारच नसतील तर गल्लेलठ्ठ पगार कशाला, आमदार प्रशांत बंब यांचा पुन्हा शिक्षकांवर थेट हल्ला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक शाळेत नीट शिकवत नाहीत. खोटेपणा करतात. मूळ नियुक्तीच्या ठिकाणी न राहता खोटे सांगून घरभाडे उचलतात. यात गेल्या दहा-पंधरा वर्षांत राज्यात ३० हजार कोटींचा खर्च झाला आहे. तेव्हा जर हे शिक्षक गावात राहून शिकवणारच नसतील तर त्यांना इतका गल्लेलठ्ठ पगार कशाला द्यायचा, असा थेट हल्ला भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शुक्रवारी पुन्हा शिक्षकांवर चढवला. हा खर्च शिक्षकांकडून वसूल करण्यात यावा. तसेच अशा शिक्षकांना पाठीशी घालणाऱ्या आमदारांवरही कारवाई करावी. अन्यथा गरज भासल्यास आपण कोर्टातही दाद मागू, अशी माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बंब यांनी दिली.

बंब म्हणाले, शिक्षकांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे नियम आहे. मात्र, तिथे न राहणारे शिक्षक मलाच धमक्या देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पदवीधर आणि शिक्षक आमदारही अशा शिक्षकांच्याच बाजूने उभे राहतात. अशा आमदारांवरही कारवाई व्हावी. पदवीधर शिक्षक आमदार आणि शिक्षक आमदार ही दोन्ही पदे रद्द करण्यात यावी. त्यांची गरज काय, अशी मागणी आपण पक्षाकडे करणार आहोत. तसेच त्यांच्या जागांवर शेतकऱ्यांचा आमदार निवडा, असेही सांगणार असल्याचे

ते म्हणाले. शिक्षक दावा करतात की ते मुख्यालयीच असतात. तेव्हा ५ सप्टेंबर शिक्षक दिनी अशा मुख्यालयी राहणाऱ्या सगळ्या शिक्षकांविषयी आम्ही आणि गावातील सरपंच, गावकरी, शाळेतील विद्यार्थी जाऊन कृतज्ञता व्यक्त करू, त्यांचा सत्कारही करू. राज्यात सर्वच ठिकाणी हे शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही याची तपासणी होणे आवश्यक आहे. इतर शाळांच्या तुलनेत जि.प. शाळांतील विद्यार्थी संख्या वाढली याविषयी विचारले असता ती कोरोनामुळे वाढली आहे, जिल्हा परिषदेच्या गुणवत्तेमुळे नाही, असेही बंब म्हणाले.

शिक्षकांच्या घरभाडे भत्त्यावर ३० हजार कोटी खर्च शिक्षकांकडून प्लॉटिंगचा व्यवसाय शिक्षक हे शिकवायचे सोडून प्लॉटिंगचा व्यवसाय करत आहेत. पती-पत्नी एकत्रीकरणात असतानाही दोघेही वेगवेगळा भाडे भत्त्याचा लाभ घेत आहेत. स्वत:चे डबे मुलांकडून धुऊन घेतात. अनेक शिक्षक गुटखा खातात. काही तर खोटे प्रमाणपत्र मिळवून पगार वाढवून घेतात, असा आरोपही बंब यांनी केला.

शिक्षकदिनी संघटना निषेध करणार आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबद्दल चुकीचे वक्तव्य करून अपमान केल्याने ५ सप्टेंबर शिक्षकदिनी राज्यातील शिक्षक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी केले आहे. शिक्षकांबद्दल अतिशय घृणास्पद वक्तव्य असल्याचे त्यांनी सांगतले.

मुख्यालयी घर बांधून द्या *आमदार बंब यांनी शिक्षकांवर केलेल आरोप चुकीचे आहेत. गावात घर भाड्याने मिळत नाही. त्यांनी घरे बांधून द्यावी. आम्ही मुख्यालयी जाऊन राहू तसेच शिक्षकांना जी इतर १५१ कामे लावलेली आहेत ती काढून घ्यावी. आम्ही गुणवत्तेवरच काम करतो. विजय साळकर, जिल्हा शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष

इतर काम लावू नका मुख्यालयी *भाजपचे प्रशांत बंब यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असून शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राच्या अवस्थेबद्दल सरकार आणि त्यांच्यासारखे आमदारच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी शिक्षकांवर आगपाखड करू नये. विधानसभेच्या आमदारांनी विधान परिषदेसंदर्भात अजिबात ढवळाढवळ करू नये. अभिजित वंजारी, आ. पदवीधर मतदारसंघ, नागपूर

बातम्या आणखी आहेत...