आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदासाठी शिरसाटांच्या नाराजीची पुन्हा चर्चा:मुख्यमंत्री शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाणार नाहीत, मतदारसंघातील कार्यक्रमांचे दिले कारण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आज शिंदे गट व भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट जाणार नाहीयेत. त्यामुळे मंत्रिपदावरुन त्यांच्या नाराजीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

शिरसाटांचे आवाहन

दुसरीकडे. आ. संजय शिरसाट यांनी मतदारसंघात माझे आधीच कार्यक्रम ठरले आहेत. त्यामुळे आज मुंबईला जाता येणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, याचा अर्थ मी नाराज आहे, असा काढू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली होती विनंती

गणेशोत्सवानिमित्त वर्षावर आज शिंदे गट व भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गट व भाजपचे सर्व आमदार या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना कार्यक्रमास हजर राहण्याची विनंती केली आहे. तरीदेखील आ. संजय शिरसाट कार्यक्रमास जाणार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अनेकदा नाराजी उघड

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्यामुळे आमदार संजय शिरसाट यांनी यापूर्वी अनेकदा उघड नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबादेत एका भर कार्यक्रमात ते म्हणाले होते, 'सिनियोरीटीचे आता काही राहिले नाही. आमच्या मागून आलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळत आहे. आमचेही काही बघा ना राव.' तसेच, उद्धव ठाकरे यांचा फोटोही त्यांनी ट्विट केला होता. मात्र, काही थोड्या वेळानेच तो काढूनही टाकला होता. चुकून ती पोस्ट पडल्याचे स्पष्टीकरण नंतर शिरसाट यांनी दिले होते. मात्र, शिरसाट यांनी आपली नाराजीच या पद्धतीने व्यक्त केल्याचे त्यावेळी बोलले गेले. आतादेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी विनंती करूनही संजय शिरसाट यांनी मुंबईला जाणे टाळल्याने पुन्हा शिरसाट नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे.

शिंदेंची परवानगी घेतली आहे - शिरसाट

दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला जाणार नसल्याबाबत संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिरसाट यांनी सांगितले, मी आज जाणार नाही याचा अर्थ मी नाराज आहे, असे नाही. कृपया असा गैरसमज करुन घेऊ नये. मतदारसंघात माझे गणेशोत्सवाबाबतचे काही कार्यक्रम पूर्वीच ठरले होते. याबाबत मी शिंदेंनाही कळवले आहे. त्यांनीदेखील मतदारसंघातील कार्यक्रमांना हजर राहण्याची परवानगी दिली आहे. त्यांनी परवानगी दिली नसती आणि वर्षावर महत्त्वाचा कार्यक्रम असता तर मी नक्की गेलो असतो.

शिंदेंचा निर्णय मान्य

मंत्रिपदाबाबत शिरसाट यांना विचारले असता शिरसाट म्हणाले, मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार कधी होईल, याबाबत आपल्याला कल्पना नाही. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. त्या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार तसेच माझ्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रिपदावरुन नाराजी वगैरेचा भाग आता संपला आहे. यापुढ या विषयावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. शिंदेसाहेब जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल.

बातम्या आणखी आहेत...