आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पहिला निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. सहा मतदारसंघांमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिला निकाल धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आला. यात भाजपचे अमरीश पटेल दणदणीत २३४ मतांनी विजयी झाले. मात्र उर्वरित पाचपैकी ३ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यापैकी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. तर भाजपचे बालेकिल्ले असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड तर नागपूर मतदारसंघात काँग्रेसचे अॅड.अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतली होती.
पुणे : भाजपच्या गडात आघाडी पुढे
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यावर आघाडी घेतली होती. पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. नागपुरात दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे अॅड. अभिजित वंजारी हे ७ हजार २६२ मतांनी पुढे होते.
सरनाईक कोट्यापासून ८,८१० मतांनी दूरच :
अमरावती शिक्षक मतदारसंघात रात्री १ च्या सुमारास तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणातून बाद झाले. तरीही अपक्ष किरण सरनाईक हेच आघाडीवर असून कोटा प्राप्त करण्यासाठी त्यांना ८ हजार ८१० मते हवी आहेत. आघाडीचे श्रीकांत देशपांडे हे दुसऱ्या क्रमांकावर होते.
धुळे-नंदुरबार : भाजपचे पटेल विजयी
धुळे व नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले.त्यांना विक्रमी ३३२ तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. ९९.३१% मतदान झाले होते. भाजपकडे १९९ मते होती. या निकालावरून महाविकास आघाडीची मते फुटल्याचे दिसून आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.