आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी औरंगाबादमधील शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने त्वरित पूर्ण निधी मंजूर करून भुयारी मार्ग तयार करून द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गेल्या दशकापासून शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे सातारा देवळाई, शिवाजीनगर येथे राहणाऱ्या लाखो लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नेमके प्रकरण काय?
औरंगाबादमधील शिवाजीनगर येथून रेल्वेचा मार्ग आहे. मात्र, रेल्वे आल्यानंतर इथले गेट बंद होते. त्यामुळे शेकडो लोक अडकून पडतात. दिवसभरात असे अनेकदा होते. त्यामुळे या भागात संग्रामनगरप्रमाणे भुयारी मार्ग बांधावा, अशी मागणी होत आहे. या मागणीला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, अजून काम सुरू झालेले नाही.
काम का थांबले?
शिवाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी अनेक वेळा भूसंपादनाचा प्रस्ताव एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे गेला. न्यायालयाने तसे निर्देश दिले. महापालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या कामाची जबाबदारी निश्चित केली. या कामासाठी फक्त 38.55 कोटी रुपये आवश्यक आहेत. मात्र, तो निधी अजूनही मिळालेले नाही. विशेष म्हणजे तरीही यापूर्वी या मार्गाचे भूमिपजून उरकण्यात आले. केंद्रीय रेल्वेमंत्री, मुख्याधिकारी यांच्या बैठका झाल्या. मात्र, काम काही सुरू झाले नाही.
फक्त टोलवाटोलवी सुरू
सातारा हद्दीतील गट नंबर 124/2 आणि 131 मधील 24 मीटर रुंद रस्त्यासाठी भूसंपादनाची गरज आहे. तसा प्रस्ताव विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. मात्र, या विषयावर टोलवाटोलवी सुरू आहे. भूसंपादनाची वर्षानुवर्षे चालणारी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. सरकारने त्वरित एक हाती रक्कम कुठल्याही खात्याकडे वर्ग करावी, या संदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्वरित रकमेची सोय करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने आज करण्यात आली.
वाहतूक कोंडीने त्रस्त
सातारा - देवळाई ही नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लाखो नागरिक या भागात राहतात. इथे मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालय, हॉटेल्स आहेत. मात्र, रेल्वे आल्यानंतर शिवाजीनगरचे गेट बंद होते. परिसरातील लोकांना जाण्यासाठी हा एकच रस्ता उपलब्ध आहे. त्यामुळे हजारो लोकांचा खोळंबा होतो. वेळ वाया जातो. तसेच शाळेमध्ये जाणारी मुले देखील वाहतुकीच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे हे काम लवकर करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.