आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी प्रश्नासाठी मनसे आक्रमक:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गाजर दाखवत मनसेने केला निषेध, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी; मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खबरदारी म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहे. त्यांचा औरंगाबाद दौरा अनेक कारणांमुळे वादळी ठरत आहे. एमआयएमसोबतच मनसेने देखील त्यांच्या विरोधात निदर्शने केली असल्याचे पाहायला मिळाले. मनसेने गाजर दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याचा निषेध केला आहे.

मनसेने आधीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना दौऱ्याला विरोध करणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने केली. त्यांनी गळ्यात गाजरांचा हार घालून आंदोलने केली. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरातील पाणी प्रश्नावर आक्रमक होत रस्त्यावर उतरली. निराला बाजार येथून जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे व राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी अनेक कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून हातात व गळ्यात गाजराचे हार घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शहरातील नागरिकांना विकासाचे गाजर दाखवणाऱ्या सरकारचा निषेध असो, पाणी आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाची अशा प्रकारच्या घोषणा देत औरंगपुरा भागातील वातावरण चांगलेच तापवले असल्याचे पाहायला मिळाले. शेवटी औरंगपुरा येथे ज्यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पोहचल्यानंतर पोलिसांनी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांनी बोलताना सांगितले की, हे सरकार गेल्या 9 महिन्यांपासून नागरिकांना विकासाचे गाजर दाखवत आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फक्त उद्घाटने करत आहेत. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. त्यामुळे मनसे आज त्यांना नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यास आली आहे व त्यांना गाजर दाखवत त्यांचा निषेध करत आहे.

बातम्या आणखी आहेत...