आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटचे दुष्परिणाम:दहावीचा मुलगा ऑनलाइन क्लास करत लागला गेमच्या नादी; पैसे उडवले, मग घर सोडून पळाला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवस ढाब्यांवर राहिलेला मुलगा पुंडलिकनगर पोलिसांनी शोधला

कोरोनामुळे शाळांचे ऑनलाइन रूपांतर होत मोबाइलवर लाइव्ह क्लासेस सुरू झाले. मात्र, काही दिवसांमध्ये त्याचे विचित्र स्वरूप समोर यायला लागले. पुंडलिकनगरमध्ये राहणाऱ्या व दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय सुमीत (नाव बदलले आहे) याला ऑनलाइन क्लास करता करता इंटरनेटवर गेम खेळण्याचा नाद लागला. नऊ महिन्यांत या गेमसाठी त्याने आई- वडिलांच्या खात्यातील २८ हजार रुपये उडवले. हा प्रकार कळाल्यानंतर आई रागावली. त्यामुळे सुमितने घर सोडले. अखेर, पुंडलिकनगर पोलिसांनी दोन दिवस शोध घेऊन त्याला सुखरूप परत आणले. शिवाय दाेन दिवस त्याचे समुपदेशनदेखील केले.

ऑनलाइन शाळेमुळे मुलांचा बहुतांश वेळ मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर जायला लागला. परंतु मागील काही दिवसांमध्ये त्याचे दुष्परिणामही समेार येऊ लागले आहेत. पुंडलिकनगरात राहणारा सोळा वर्षीय मुलगा सुमीतचेदेखील ऑनलाइन वर्ग सुरू होते. परंतु ते करत असतानाच ताे इंटरनेटवर सर्फिंगही करू लागला. त्यातच त्याला ‘फ्री फोर्स’ नावाचा गेम दिसला व त्याचा छंद जडला. गेम पेड (शुल्क लागू असलेला) असल्याने तो कधी शंभर, कधी दाेनशे, तीनशे रुपये त्याच्यावर खर्च करायला लागला. आईच्या नावे असलेल्या पेटीएमच्या खात्याचा क्रमांक लिंक करून सुमीत हे पैसे या खेळात लावू लागला. मेपर्यंत त्याने आईच्या खात्यातील ८ हजार व वडिलांच्या खात्यातील २८ हजार रुपये उडवले. १५ जून रोजी आई बँकेत गेली असता तिला हा प्रकार कळाला.

पेटिएमला आईचे बँक खाते जोडलेले असल्याने या बँक खात्यातून सुमीत पैसे उडवत राहिला. आईने त्याला चांगलेच धारेवर धरले. त्यानेदेखील चूक मान्य केली. मात्र, आई-वडिलांचे रागावणे सुमीतने मनावर घेतले व तो घराबाहेर पडला. नेहमीप्रमाणे रात्रीपर्यंत तो घरी येईल असे वाटल्याने आईवडिलांनी त्याची वाट पाहिली. परंतु १६ जूनची सकाळ झाली तरी तो न आल्याने मात्र दोघेही घाबरले. त्यानंतर त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्याकडे धाव घेतली. सुमीत अल्पवयीन असल्याने तत्काळ या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनवणे यांच्यासह उपनिरीक्षक विठ्ठल घोडके, अंमलदार निखिल खराडकर, गजेंद्र गोलवाल, गणेश डोईफोडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्यांनी जवळपास २२ सीसीटीव्हीच फुटेज तपासले. अखेर दाेन दिवसांनी सुमीतला शाेधण्यात यश अाले.

दिल्लीकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये सापडला सुमीत
१८ जून रोजी रात्री सुमीतने एका अनोळखी क्रमांकावरून कॉल केला व बोलता बोलता कट केला. त्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मोबाइलधारकाला संपर्क केला असता ताे साजापूर फाट्यावर असल्याचे कळाले. मात्र, तिथे जाईपर्यंत सुमीतने पुन्हा जागा बदलली. मात्र, १८ जून रोजी दिवसभर त्या परिसरात शोध घेतल्यावर सुमीत एका कंटेनरमध्ये झाेपलेला आढळला. तीन दिवस सिडको बसस्थानक, रेल्वेस्थानक भागात फिरत तो साजापूर फाट्यावर पोहोचला. कंटेनरचालकानेदेखील त्याला दिल्लीला घेऊन जातो असे सांगितले. मात्र, सुदैवाने पोलिसांनी त्याआधीच त्याचा शोध घेत सुखरूप घरी आणले. त्यानंतरही सोनवणे, घोडके यांनी त्याची दोन दिवस भेट घेऊन समुपदेशन केले. तसेच संपर्क क्रमांक दिल्याने पोलिसांची भीती जाऊन सुमीत घटनेतून सावरला.

पालकांनो, मुलगा काय करतोय त्याकडे लक्ष द्या
शाेधून आणलेल्या सुमीतला धाकदपटशा न करता मित्र म्हणून पाेलिसांनी त्याच्याशी संवाद साधला. एन-४ मधील नामांकित शाळेत दहावीत शिकणारा सुमीत म्हणाला की, ‘मला ऑनलाइन अभ्यासाचा कंटाळा आला हाेता. म्हणून मित्राप्रमाणे मीही गेम खेळायला लागलो. आईचे पैसे उडवल्याची चूक मी मान्य केली पण तरीही आई रागावल्याने घर सोडले.’ त्यावर पोलिसांनी त्याला आई-वडील भल्यासाठीच बाेलत असतात, त्यांचे मुलांवर प्रेम असतेच, हे सुमीतला समजावून सांगितले. त्यालाही ते पटले. इतकेच नव्हे तर यापुढे कधीही काही अडचण आली, ती घरी सांगता आली नाही तर फाेन कर, असे सांगून पाेलिस अधिकाऱ्यांनी त्याला आपले नंबरही दिले.

लॉकडाऊनमध्ये अनेक मुलांचे स्वभाव बदलले आहेत. ते टोकाचे पाऊल उचलत असल्याची अनेक उदाहरणे आमच्यापर्यंत आल्याचे सहायक पाेलिस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितले. मात्र पालकांनी आपला मुलगा किंवा मुलगी मोबाइलवर काय करतोय, अभ्यास कसा करतोय, काय पाहतोय, हे आवर्जून तपासावे. त्याच्याशी नियमित संवाद साधावा. महत्त्वाचे म्हणजे त्यांना समजून घेतले तर अशा घटना टळू शकतील, असे आवाहनही यानिमित्ताने साेनवणे यांनी सर्व पालकांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...