आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनर्थ टळला:मित्राने दिलेला मोबाइल आईच्या हाती; रागाच्या भरात तरुणी हर्सूल तलावावर; सुरक्षा रक्षक, दामिनी पथकाने धाव घेत तरुणीचे केले समुपदेश

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्राने दिलेला मोबाइल घरात सापडल्यामुळे आईने आपल्या तरुण मुलीला जाब विचारला. ‘काहीतरी’ घडत असल्याच्या संशयावरून आईने रागावून तुझे लग्नच लावते, शिक्षण बंद करते, असा इशारा दिला. त्यामुळे चिडलेल्या मुलीने थेट आत्महत्येचा विचार करून हर्सूल तलाव गाठला. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत तरुणीला पकडून बाजूला नेले. तसेच पाेलिसांच्या दामिनी पथकाला कॉल करून तरुणीला त्यांच्या हवाली केले. त्यामुळे या तरुणीचे प्राण वाचले.

बुधवारी दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली. हर्सूल परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय युवतीची काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी मैत्री झाली. त्याने तिला मोबाइल घेऊन दिला होता. घरात असताना ही तरुणी तो माेबाइल लपवून ठेवत हाेती. बुधवारी सकाळी आई घर आवरत असताना तिला मुलीचा मोबाइल हाती लागला. आईने विचारणा केल्यानंतर मुलीने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु आईला दाट संशय आला. तिने मुलीला जाब विचारला.

तसेच ‘तुझे लग्नच लावून देते’ असे म्हणत खडसावल्यानंतर मुलीने रागाच्या भरात घर सोडले. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ती थेट हर्सूल तलावावर गेली. तिथे महापालिकेचे सुरक्षा रक्षक राजेश गवळे, कैलास वाणी यांना ही तरुणी तलावावर संशयास्पदरीत्या फिरताना दिसली. त्यांनी तत्काळ तिला बाजूला घेतले. तसेच पाेलिसांच्या दामिनी पथकाला कॉल करून माहिती दिली.

आई-वडील करतात मजुरीकाम
पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा उमप, पोलिस नाईक निर्मला निंभोर, अाशा गायकवाड, संगीता दांडगे, सुमन पवार यांनी तरुणीची विचारपूस केली तेव्हा तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईला संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिले. या तरुणीचे वडील दुसऱ्या शहरात मजुरी करतात, तर आईदेखील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. तिला एक भाऊ व एक बहीणही आहे. दामिनी पथकाने कुटुंब व मुलीची समजूत घालून त्यांना घरी पाठवले.

बातम्या आणखी आहेत...