आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्जन्यमान:मान्सूनचा आस हिमालयाकडे सरकणार; राज्यात ऑगस्टमध्ये पाऊस ओसरणार; पावसात मोठा खंड पडणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या 11 जिल्ह्यांत पावसाची तूट; उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाची तूट

राज्यात जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. ऑगस्टमध्ये मात्र पावसाने राज्याकडे पाठ फिरवली आहे. त्यातच १० ऑगस्टपासून मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्यता असल्याने ऑगस्ट कोरडा जाण्याचे मळभ राज्यावर आहे. जुलैमध्ये जोरदार बरसणाऱ्या मान्सूनच्या धारा ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच ओसरल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची तूट वाढत आहे. सध्या राज्यातील ११ जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट पडली आहे. मान्सूनचा आस हिमालयाकडे सरकल्यास राज्यातील पावसाचे प्रमाण अत्यल्प राहून ही तूट आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात यंदा एक जून ते ३० जुलै या काळात पावसाने चांगली हजेरी लावली. या काळात राज्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत २६% जास्त पाऊस झाला. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला. त्यातच मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा १० ऑगस्टपासून हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने त्यांच्या ताज्या अहवालात वर्तवला आहे. असे झाले तर महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर आेसरण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाची तूट
जुलैमध्ये उत्तर महाराष्ट्र व विदर्भात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी उत्तर महाराष्ट्रातील तीन तर विदर्भातील ७ जिल्ह्यांत पावसाची तूट पडली आहे.

हा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला तर राज्यावर काय परिणाम होतो ?
हा आस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे खेचण्याचे काम करत असतो. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात चांगल्या पावसासाठी हा आस त्याच्या नेहमीच्या स्थानी म्हणजे मघ्य भारतावर असणे आवश्यक असते. तो जर हिमालयाकडे सरकला तर महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण कमी होते.

दिव्य मराठी एक्सप्लेनर - डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ
मान्सूनचा आस (ट्रफ) म्हणजे काय ?

पावसाळ्यात पश्चिम राजस्थान ते आसाम-मेघालयापर्यंत मध्य भारतातून जाणारा कमी दाबाचा पट्टा म्हणजे मान्सूनचा आस (ट्रफ) होय.

ही स्थिती किती दिवस राहते?
सध्याच्या अंदाजानुसार १५ ऑगस्टपर्यंत हा आस हिमालयाकडे राहण्याची शक्यता आहे.

या काळात राज्यात पावसाची स्थिती काय राहील?
मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस राहील. विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहील.

२६ तालुक्यांत सरासरीच्या ७५%
कृषी विभागानुसार राज्यात दि. एक जून ते दोन आॅगस्टअखेरीस सरासरीच्या तुलनेत ३५५ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांत २५ ते ५० %, १८ तालुक्यांत ५० ते ७५ %, ५८ तालुक्यांत ७५ ते १०० टक्के तर २७१ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

राज्यातील धरणांत ५३.५२ % पाणीसाठा
राज्यातील एकूण ३२६७ प्रकल्पांत सध्या ५३.५२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात ४६.२८% पाणीसाठा होता.

जिल्हा तूट
धुळे 28%
जळगाव 20%
नंदुरबार 44%
जिल्हा तूट
अकोला 09%
अमरावती 17%
भंडारा 01%
जिल्हा तूट
बुलडाणा 18%
गडचिरोली 12%
गोंदिया 16%
जिल्हा तूट
वर्धा 01%
हिंगोली 01%

डॉ. एस. बी. पवार, कृषी विस्तार विद्यावेत्ता, औरंगाबाद

  • सध्या ढगाळ हवामान व फवारणी केल्याप्रमाणे पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. नियंत्रणासाठी शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी.
  • सोयाबीनवर पाने खाणारी अळी, मका व ज्वारीवर लष्करी अळीचा, कापूस पिकावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • पावसात १५ दिवसांचा खंड पडला आहे तेथे पिकावर पोटॅशियम नायट्रेट १०० ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारावे.
बातम्या आणखी आहेत...